दोघांत तिसरा, पहिले नाव विसरा! दोन अपक्ष सदस्यांच्या साथीने मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 01:26 PM2022-05-10T13:26:08+5:302022-05-10T13:28:49+5:30

दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करतील. त्यानंतर हात उंचावून मतदानाची प्रक्रिया घेतली जाईल. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल.

Gondia Zilla Parishad President and Vice President Election, who will win | दोघांत तिसरा, पहिले नाव विसरा! दोन अपक्ष सदस्यांच्या साथीने मार्ग सुकर

दोघांत तिसरा, पहिले नाव विसरा! दोन अपक्ष सदस्यांच्या साथीने मार्ग सुकर

googlenewsNext
ठळक मुद्देआज होणार जि. प. अध्यक्षाची निवड

गोंदिया : मागील तीन महिन्यांपासून रखडलेल्या गोंदियाजिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक मंगळवारी (दि.१०) दुपारी ३ वाजता होणार आहे. जिल्हा परिषदेत २६ जागा जिंकत सर्वांत मोठा पक्ष ठरलेला भाजप दोन अपक्ष सदस्यांच्या मदतीने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. अध्यक्षपदाला घेऊन मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या नावांमध्ये ऐनवेळी नवीन नाव पुढे आल्याने दोघात तिसरा पहिले नाव विसरा असे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपच्या दोन बंडखोरांनी निवडणूक जिंकली. त्यापैकी एका उमेदवाराची नागपूर निवासी व एकाची गोंदिया निवासी नेत्याने तिकीट कापल्याची चर्चा होती. त्यामुळे त्या अपक्षांनी आम्ही त्या दोघांच्या माध्यमातून पक्षाला सहकार्य करणार नाही, अशी भूमिका आधी घेतली होती. त्यामुळे त्या दोन्ही नेत्यांना डावलून परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी या दोघांचीही गरज असल्याने भाजपच्या संघ नेत्यांनी संघाचे कार्यकर्ते असलेले खासदार सुनील मेंढे व तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांना ही जबाबदारी देत त्यांना सोबत घेण्याची जबाबदारी दिली होती. त्या नेत्यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्या दोन्ही अपक्षांना नागपूर येथे पार्लेमेंटरी बोर्डाच्या बैठकीपूर्वी हजर करीत त्यांचे समर्थन भाजपला मिळवून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे जि. प. सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. या दोन्ही अपक्षांना सभापती दिले जाणार आहे. एकाला बांधकाम व अर्थ तर एकाला महिला बालकल्याण दिले जाणार असल्याची माहिती आहे.

माजी आमदार पुत्राच्या नावावर शिक्कामोर्तब ?

जिल्हा परिषद अध्यक्षपदाला घेऊन मागील तीन महिन्यापासून भाजपकडून संजय टेंभरे, लक्ष्मण भगत, लायकराम भेंडारकर यांच्या नावांची चर्चा होती. संजय टेंभरे यांच्या नावासाठी गोंदिया नेत्याने आग्रह धरला होता, तर लायकराम भेंडारकर यांच्या नावासाठी आमदार परिणय फुके यांनी आग्रह धरला होता. मात्र यात समन्वय साधत माजी आमदार खोमेश्वर रहांगडाले यांचे पुत्र जि. प. सदस्य पंकज रहांगडाले यांचे नाव पुढे आले आहे. यासाठी आमदार विजय रहांगडाले व इतर भाजप नेते सुद्धा अनुकूल असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडल्यास नवल वाटू नये. पण भाजपने अखेच्या क्षणापर्यंत नावावर मौन धारण केले आहे.

तर सभागृहातील चित्र राहू शकते वेगळे

एक आमदार व जिल्ह्यातील काही नेते मात्र जि. प. अध्यक्षपदासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सदस्य लायकराम भेंडारकर यांच्यासाठी हट्ट धरला आहे. त्यामुळे भाजपमध्येही विचित्र काही घडले तर नवल राहणार नाही. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान प्रत्यक्षात सभागृहात काही वेगळेच चित्र राहू शकते अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे.

हात उंचावून होणार मतदान

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारीस सकाळी ११ वाजता सदस्य अर्ज दाखल करतील. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी १ वाजतापर्यंत कालावधी दिला जाईल. दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करतील. त्यानंतर हात उंचावून मतदानाची प्रक्रिया घेतली जाईल. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल.

नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून निर्माण झाला तेढ

अध्यक्षपदाच्या नावाला घेऊन जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये तेढ निर्माण झाले आहे. एका आमदाराने लायकराम भेंडारकर, तर दुसऱ्या माजी आमदाराने लायकराम भेंडारकर यांचा, तर खासदार आणि एका आमदाराने दुसऱ्याला सदस्याच्या नावाला अनुकूलता दर्शविल्याने यावरून नेत्यांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाल्याची चर्चा भाजपमध्ये दबक्या आवाजात आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नेमके कोणते औषध शोधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Gondia Zilla Parishad President and Vice President Election, who will win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.