एका नावावर शिक्कामोर्तब नाहीच; आता नागपूरच्या बैठकीत ठरणार गोंदिया जि.प.चा अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2022 12:24 PM2022-05-03T12:24:22+5:302022-05-03T12:28:15+5:30
अध्यक्षपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी ७ मे रोजी नागपूर येथे बैठक बोलविली असून याच बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
गोंदिया : मागील तीन महिन्यांपासून लांबलेली गोंदियाजिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूृक जिल्हा निवडणूक विभागाने १० मे रोजी जाहीर केली आहे. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षाच्या नावावर अद्यापही शिक्कामोर्तब करण्यात जिल्ह्यातील भाजप नेत्यांना यश आले नाही. त्यामुळे यावर आता नागपूर येथे ७ मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता भाजप सत्ता स्थापनेचा प्रबळ दावेदार आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या आकड्याची गरज आहे. जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये भाजपचे २६, काँग्रेस १३, राष्ट्रवादी ८, चाबी ४ आणि २ अपक्ष सदस्यांचा समावेश आहे. पण सध्याचे जिल्ह्यातील राजकीय समीकरण पाहता काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन अपक्ष सदस्यांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याची शक्यता कमी आहे. त्या दृष्टीने या दोन्ही पक्ष्यांच्या कुठल्याच हालचालीसुद्धा सुरू नाही.
तर गोंदिया जिल्हा परिषदेतील आजवरचा इतिहास पाहता काँग्रेसने राष्ट्रवादीला बाजूलाच सारण्याचाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळेच सत्ता स्थापनेसाठी भाजपची स्थिती सध्या भक्कम आहे. त्यासाठी मागील आठवडाभरापासून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हालचालीसुद्धा सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप नेत्यांच्या आतापर्यंत दोन तीन बैठकासुद्धा पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण अध्यक्षपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी ७ मे रोजी नागपूर येथे बैठक बोलविली असून याच बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
नावावर भाजप नेत्यांचे मौन
जिल्हा परिषद अध्यक्षपदी कुणाची वर्णी लावायची हे जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी जवळपास निश्चित केले आहे. पण नेमक्या कुठल्या नावांची चर्चा आहे यावर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी अद्यापही काहीच सांगितले नसून सर्व निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेणार असल्याचे सांगितले. पण नावांवर मौन बाळगले आहे.
अर्जुनी मोरगावसाठी 'त्या' आमदाराचा आग्रह, इच्छुकांचा हिरमोड
जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या मर्जीतील असल्यास बरीच कामे तडीस नेण्यास मदत होते. त्यामुळे एका आमदाराने अध्यक्षपदी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्याची वर्णी लावावी यासाठी आग्रह धरला आहे. या आमदाराची वरिष्ठ पातळीवरदेखील चांगली पकड आहे. त्यामुळे नेमकी कुणाची वर्णी लागते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले.