बालाघाटच्या विटांंमुळे गोंदियाचे व्यावसायिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:29 AM2021-03-05T04:29:01+5:302021-03-05T04:29:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रावणवाडी : शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट येथील विटा स्वस्त पडत असल्याने त्यांना मागणी वाढली असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रावणवाडी : शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट येथील विटा स्वस्त पडत असल्याने त्यांना मागणी वाढली असून, यामुळे गोंदियातील वीट व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. अशातच या व्यावसायिकांनी बुधवारी (दि. ३) बालाघाट येथून विटा घेऊन येणारी २ वाहने पकडली.
गोंदियात धानाचा कोंडा महागल्यामुळे येथील विटा सात ते आठ हजार रूपये गाडी या दराने मिळत आहेत. तर बालाघाट येथील विटा पाच हजार रूपये गाडी दराने मिळत आहेत. परिणामी गोंदियातील विटांना मागणी घटली असून, बालाघाट येथून विटा मागवल्या जात आहेत. यामुळे गोंदियातील वीट व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. अशातच गोंदियातील काही वीट व्यावसायिकांनी बालाघाट येथून विटा घेऊन येणाऱ्या रॉयल्टी नसलेल्या २ वाहनांना पकडले होते. याबाबत महसूल विभागातील अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असता, तेही घटनास्थळी आले होते. मात्र, या वाहनांवर काय कारवाई करावी, यासाठी ते आपल्या वरिष्ठांसोबत बोलत होते. मध्य प्रदेशातील स्वस्त विटांमुळे येथील वीट व्यावसायिक अडचणीत सापडल्याने आता काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. बुधवारी रावणवाडी येथे मध्य प्रदेशातून विटा घेऊन येणाऱ्या वाहनांमुळे चांगलाच गोंधळ सुरू होता. दरम्यान, नियमानुसार या वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.