गोंदियाने उभारली ‘शिक्षणाची गुढी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:05 PM2018-03-19T22:05:33+5:302018-03-19T22:05:33+5:30

गोंदिया जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या ‘गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा’ या अभिनव उपक्रमाने यावर्षी विक्रमी उच्चांक गाठला. प्रथमच एकाच दिवशी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करुन गुढीपाडव्याची दिवशी शिक्षणाची गुढी उभारण्यात आली.

Gondia's 'Education Gudhi' | गोंदियाने उभारली ‘शिक्षणाची गुढी’

गोंदियाने उभारली ‘शिक्षणाची गुढी’

Next
ठळक मुद्देजि.प.चा उपक्रम : एकाच दिवशी नऊ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

आॅनलाईन लोकमत
वडेगाव : गोंदिया जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या ‘गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा’ या अभिनव उपक्रमाने यावर्षी विक्रमी उच्चांक गाठला. प्रथमच एकाच दिवशी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करुन गुढीपाडव्याची दिवशी शिक्षणाची गुढी उभारण्यात आली. अशा प्रकारचा उपक्रम राबविणार गोंदिया जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे.
खासगी आणि इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रस्थामुळे जिल्हा परिषद शाळांना अवकळा आल्याचे चित्र आहे. त्यामुळे जि.प.च्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारुन विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच अंतर्गत जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने २०१५-१६ पासून ‘गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा’ हा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षी देखील हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी या उपक्रमाला उपक्रम म्हणून न राबविता त्याचा उत्सव करीत गावागावांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा केला. गावागावात शिक्षकांनी पोष्टर, बॅनर्सद्वारे जनजागृती करुन लोकसहभागातून भजन, दिंडीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले.
सर्वेक्षणानुसार ११ हजार ९३३ विद्यार्थी दाखलपात्र होते. त्यापैकी ८७७६ विद्यार्थ्यांना गुढीपाडवाच्या दिवशी शाळेत दाखल करण्यात आले. येत्या ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ही संख्या अकरा हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
तिरोडा तालुक्यात १०० टक्के दिव्यांग विद्यार्थी दाखल
तिरोडा तालुक्यात शाळा प्रवेशाची मोहीम यशस्वी राबविली जात असतानाच तालुक्यातील दाखलपात्र ३० दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी सर्व १०० टक्के दिव्यांग विद्यार्थ्यांना व ७९ टक्के सर्व सामान्य विद्यार्थ्यांना विशेष शिक्षक, साधन व्यक्ती व शिक्षकांच्या मदतीने शाळेत दाखल करण्यात आले.
चार शाळेत १०० टक्के विद्यार्थी दाखल
दरम्यान गोरेगाव तालुक्यातील गणखैरा केंद्रांतर्गत येणाऱ्या सुकाटोला, गणखैरा टोला, हरिजनटोली व चिचगाव येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल पात्र १०० टकके विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी प्राचार्य डायट, गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांनी संबंधित शाळांचे कौतुक केले आहे.

शाळा प्रवेशाचा उपक्रम शिक्षण विभागाने राबविला असला तरी त्यास उत्सवाचे रुप आणून त्याला खऱ्या अर्थी सार्थकी लावण्याचे काम शिक्षकांनी करुन दाखविले आहे.
- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी गोंदिया

Web Title: Gondia's 'Education Gudhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.