गंभीर रुग्णांनाही मिळते, तारीख पे तारीख; गोरगरिबांचा वाली कोण?

By नरेश रहिले | Published: July 19, 2023 03:59 PM2023-07-19T15:59:33+5:302023-07-19T16:01:20+5:30

बीजीडब्ल्यू, मेडिकलमध्ये ६० डॉक्टरांची पदे रिक्त : वरिष्ठ घेणार का दखल

Gondia's Government Medical College and Bai Gangabai Women's Hospital together have as many as 60 doctor vacancies | गंभीर रुग्णांनाही मिळते, तारीख पे तारीख; गोरगरिबांचा वाली कोण?

गंभीर रुग्णांनाही मिळते, तारीख पे तारीख; गोरगरिबांचा वाली कोण?

googlenewsNext

नरेश रहिले

गोंदिया : जिल्ह्यातील १४ लाख लोकसंख्येची धुरा सांभाळणारे वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टरांच्या कमतरतेने स्वत:च लुळे-पांगळे होऊन बसले आहे. उपचार होईल अशी मोठी अपेक्षा घेऊन येणाऱ्या रुग्णांना येथील डॉक्टरांकडून तारीख पे तारीख दिली जाते.

गोंदियाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय मिळून तब्बल ६० डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अत्यल्प डॉक्टरांच्या भरवशावर आरोग्य सेवाच ऑक्सिजनवर आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड जिल्ह्यात सर्वदूर गेल्याने स्वत: काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालय गाठून १५ ऑगस्टपर्यंत येथील रुग्णांना दिली जाणारी सेवा सुधारा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

साधारण रुग्णांवर थातूरमातूर उपचार केला जातो. परंतु शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना वारंवार तारीख पे तारीख दिली जाते. आरोग्य सेवा देण्याबरोबर इतर समस्यांनाही येथील रुग्णांना लढा द्यावा लागतो. ज्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या त्यांना जंतू संसर्गाचा धोका असतो. वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत येणाऱ्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात डुकरांचा सर्रास वावर असल्याने येथील रुग्णांना मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होतो. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.

धुणी, भांडी रस्त्यावर

- बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे नातेवाईक चार दिवस रुग्णालयात घालवत असल्याने त्या रस्त्यावर धुणी-भांडी करतात. बहुतांश वेळा रस्त्यावर वृद्ध महिला आंघोळ करतात. धुणी-भांडी रस्त्यावर करीत असल्याने रस्त्याच्या बाजूला चिखल तयार होतो. परिणामी या चिखलात डासांची उत्पत्ती होते.

परिसरात दुर्गंधी

बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात घाणीचे साम्राज्य असल्याने जिकडे-तिकडे दुर्गंधी येते. त्या दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी काही लोक मास्क घालतात तर ग्रामीण भागातील महिला आपल्या साडीचा पदरच तोंडाला बांधून या दुर्गंधीपासून आपला बचाव करतात.

अन्न डस्टबिनच्या बाहेर टाकले जाते

बाई गंगाबाई स्त्री रुणालयात असो किंवा वैद्यकीय महाविद्यालयात असो या दोन्ही ठिकाणी आरोग्य विभागातर्फे डस्टबिन ठेवण्यात आले आहेत. परंतु त्या डस्टबिनमध्ये ओला किंवा सुका कचरा न टाकता रुग्णांचे नातेवाईक बाहेर टाकतात. अन्नही बाहेर टाकले जाते.

उरलेले अन्न फेकले जाते

- बाई गंगाबाई रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना खालसा सेवा दलातर्फे व रोटरी क्लबतर्फे दररोज मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे.

- जेवण केल्यानंतर ताटात उरलेले अन्न पद्धतशिररीत्या त्याची विल्हेवाट न लावता वाट्टेल त्या ठिकाणी ते अन्न फेकून दिले जाते. त्यामुळे त्या अन्नावर माशा घोंगावताना दिसतात. रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी असल्याने ते आजारीही पडू शकतात.

डुकरांचा मुक्तसंचार जंतू संसर्गाला आमंत्रण

बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात वर्षाकाठी ७५०० च्या वर महिलांची प्रसूती केली जाते. ५ हजाराच्या घरात सामान्य प्रसूती व अडीच हजार सिझेरियन केले जाते. परंतु गंगाबाई रुग्णालयात अस्वच्छता आणि डुकरांचा सतत वावर असल्याने येथील रुग्णांना अस्वच्छतेमुळे जंतू संसर्ग होण्याचा धोका असतो. नेत्यांनी किंवा मोठ्या अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला गंगाबाई रुग्णालयाचा दौरा केल्यावर स्वच्छता राखली जाईल.

गंगाबाईत दिव्याखाली अंधार

- आरोग्य विभागाकडून हिवतापावर नेहमीच जनजागृती केले जाते. सर्वसामान्य लोकांना मलेरिया होऊ नये म्हणून त्यांना अमूक करा- तमुक करा, असे सांगितले जाते.

- पावसाळ्यात गटारे वाटते करा, पाणी साचले राहू देऊ नका, भांडी रिकामे करून ठेवा, असे सांगितले जाते. परंतु गंगाबाई स्त्री रुग्णालय आरोग्य विभागाच्या नियमांना पाळत नाही. त्यामुळे नियम सांगणाऱ्या गंगबाई स्त्री रुग्णालय ’ दिव्याच्या खाली अंधार’ असेच म्हणावे लागेल.

मलेरियाला आमंत्रण

- गंगाबाई स्त्री रुग्णालयात उन्हाळ्यात लावलेले कूलर्स आतापर्यंत निघाले नाही. पावसाचे पाणी त्या कूलरच्या टपात भरले. तब्बल महिनाभरापासून हे कूलर तसेच आहे.

- या कूलरमध्ये जमा झालेल्या पाण्यावर शेवाळ तयार झाले. मलेरिया होणाऱ्या डासांनी यात अंडी घातली आहेत.

नातेवाईक मारतात खऱ्याच्या पिचकाऱ्या

बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात गर्भवतींची प्रसूती करण्यासाठी असलेल्या शस्त्रक्रियागृहाच्या बाहेर रुग्णांची गर्दी नेहमीच असते. या ठिकाणी उभे राहून आपल्या रुग्णाची प्रतीक्षा करणारे नातेवाईक खर्रा चघळत असतात. ते खर्रा चघळताना शस्त्रक्रिया केल्या जाणाऱ्या दाराच्या कोपऱ्यातच पिचकाऱ्या मारतात.

जेवणाची सोडून सर्वच तक्रारी

गंगाबाई स्त्री रुग्णालय असो किंवा वैद्यकीय महाविद्यालय असो या दोन्ही ठिकाणी रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था चांगली आहे. जेवण शासनाकडून मिळते. मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांना सकाळ- संध्याकाळ मोफत जेवण देण्याची सोय गोंदियातील सामाजिक संघटनांनी केली आहे. या रुग्णालयात जेवणाची तक्रार एकही नाही. परंतु जेवणाची गोष्ट सोडली तर प्रत्येक बाबीची तक्रार केली जाते.

मिळेल त्या ठिकाणी आश्रय

गंगाबाईत दररोज प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांची गर्दी पाहून येथील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेले विश्रामगृह नेहमीच 'हाऊसफुल्ल' असलेले दिसते. त्यामुळे अनेक रुग्णांचे नातेवाईक मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतात.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेसंदर्भात तक्रार आल्यास आम्ही त्या तक्रारीचे वेळीच निवारण करतो. वैद्यकीय महाविद्यालयात. येणाऱ्या रुग्णांचा उपचार होईल असा पुरेसा मनुष्यबळ आमच्याकडे आहे. रुग्णांची गैरसोय होणार नाही याकडे आमचे लक्ष असते. सेवेला प्राधान्य दिले जाते. औषध साठाही पुरेसा आहे. गरज पडल्यास औषधेही त्वरित मागवले जातात.

- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.

जिल्ह्यातील अखेरच्या टोकापासूनच्या महिला प्रसूतीसाठी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात येतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची विशेष काळजी घेतली जाते. माता व बालमृत्यू होऊ नये यासाठी प्रयत्न केले जाते. रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत.

- डॉ. सचिन उईके, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय

Web Title: Gondia's Government Medical College and Bai Gangabai Women's Hospital together have as many as 60 doctor vacancies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.