गोंदियाच्या प्रज्वलची सौर सायकल धावणार नागपूरच्या अंबाझरी गार्डनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:11 PM2019-07-09T12:11:02+5:302019-07-09T12:12:56+5:30
सौर ऊर्जा ही कधीही न संपणारी ऊर्जा आहे. हीच बाब हेरुन आमगाव येथील तुलसी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रज्वल चंद्रशेखर टेंभूर्णे या विद्यार्थ्याने सौर ऊर्जेवर धावणारी सायकल तयारी केली आहे.
राजीव फुंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शिवाय भविष्यात पेट्रोल डिझेलचा साठा कधी तरी संपणार आहे. मात्र सौर ऊर्जा ही कधीही न संपणारी ऊर्जा आहे. हीच बाब हेरुन आमगाव येथील तुलसी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रज्वल चंद्रशेखर टेंभूर्णे या विद्यार्थ्याने सौर ऊर्जेवर धावणारी सायकल तयारी केली आहे. या सायकलची राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेतली असून त्याला पाच सायकल तयार करण्याचे आर्डर दिले आहे. प्रज्वलच्या प्रयोगाची राज्यस्तरावर दखल घेतल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
येथील तुलसी आयटीआयमधील द्वितीय वर्षातील विद्यार्थी प्रज्वल याला लहानपनापासूनच टाकाऊपासून टिकावू वस्तू किंवा यंत्र तयार करण्याचा छंद आहे.शालेय जीवनात अनेक घडामोडींवर लक्ष ठेवून त्याने कायमस्वरुपी यंत्र तयार केले. त्यात आता सौर ऊर्जेवर चालणारी सायकल या त्याच्या प्रयोगाने प्रज्वलची स्वत:ची ओळख निर्माण करवून दिली आहे. सौर ऊर्जेवर एक तासात ३५ कि.मी. अंतर या सायकलने गाठता येते. तापमानात बदल घडून आल्यास पायडल मारुनही सायकल चालविता येऊ शकते. ही सोलर सायकल तयार करण्यासाठी प्रज्वलने सोलर संच, सायकल, बॅटरी, कंट्रोलर, डीसी मोटार आदी साहित्यांचा वापर केला आहे. सध्या डिझेल व पेट्रोल दर आभाळ गाठत आहेत. अशा स्थितीत सोलर सायकल निसर्गाने भेट दिलेल्या सौर ऊर्जेवर धावणार असल्याने आर्थिक बचत होणार आहे. या प्रयोगासाठी गणेश ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक विजय बहेकार यांनी आर्थिक मदत केली असल्याचे प्रज्वलने प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.भंडारा येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयतर्फे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीत सोलर सायकलचे कौतुक करुन जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली होती. त्यानंतर सौर ऊर्जेसाठी आग्रह धरणारे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रणयच्या सौर सायकलची दखल घेतली आहे. नुतकेच प्रज्वलला त्यांनी पाच सौर सायकल तयार करण्याचे आर्डर दिले आहे. या सायकल नागपूर येथील अंबाझरी इको गार्डनमध्ये ठेवण्यात येणार आहे. १५ जुुुुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इको गार्डनचे उद्घाटन करण्यात येणार असून त्यांच्याच हस्ते सौर सायकल सफरीला सुरूवात केली जाणार असल्याचे प्रज्वलने लोकमतशी बोलताना सांगितले.
१ सायकल तयार करण्यासाठी २२ हजार रुपयांचा खर्च
सोलर सायकल तयार करण्यासाठी प्रज्वलने सोलर संच, सायकल, बॅटरी, कंट्रोलर, डीसी मोटार आदी साहित्यांचा वापर करुन तयार केली आहे. ही सायकल तयार करण्यासाठी २२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. यासाठी लागणारे साहित्य मुंबई येथून त्याने मागविले. विशेष म्हणजे प्रणवला पाच सायकल तयार करण्याचे आर्डर मिळाले असून त्यासाठी तो मुंबई येथे जाणार असल्याचे सांगितले.
शिक्षणासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा
प्रज्वलची आई-वडील मजुरी करीत असून त्याला पुढे उच्चशिक्षण घेण्याची इच्छा आहे. पण घरात अठराविश्व दारिद्र असल्यामुळे मधातच शिक्षण सोडण्याची पाळी आली आहे. अशात शासनाने उच्च शिक्षणासाठी मदत करावी अशी अपेक्षा प्रज्वलच्या पालकांनी व्यक्त केली.
भविष्यात सोलर चारचाकी तयारी करण्याची इच्छा
वाहनांमुळे होत असलेल्या प्रदूषणाचे तोटे आता समोर येवू लागले आहेत.त्यामुळे यावर मात करण्यासाठी फक्त सायकलवर गप्प न बसता भविष्यात चारचाकी वाहन तयार करण्याची प्रज्लवची इच्छा आहे. त्याकरीता उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी लागणार आहे. त्यानंतर चार-तिनचाकी सोलर वाहन जिल्ह्यातील रस्त्यांवर धावणार असे प्रज्वल सांगतो.