गोंदियाचे रेल्वेस्थानक बनणार ‘आदर्श’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2016 04:09 AM2016-04-05T04:09:09+5:302016-04-05T04:09:09+5:30

अवघ्या दोन कोटी रुपयांच्या खर्चातून गोंदिया स्थानकाला आदर्श रेल्वे स्थानक बनविण्यात येत असल्याची माहिती

Gondia's railway station will become 'ideal' | गोंदियाचे रेल्वेस्थानक बनणार ‘आदर्श’

गोंदियाचे रेल्वेस्थानक बनणार ‘आदर्श’

Next

गोंदिया : अवघ्या दोन कोटी रुपयांच्या खर्चातून गोंदिया स्थानकाला आदर्श रेल्वे स्थानक बनविण्यात येत असल्याची माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आलोक कंसल यांनी सोमवारी येथे दिली. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आले असताना त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
आदर्श रेल्वे स्थानक बनल्यानंतर अधिक सोयी-सुविधा गोंदियातील रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होतील. यासाठी मंजुरी प्राप्त करण्याच्या उद्देशाने एक प्रस्ताव बनवून रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला असल्याचेही कंसल यांनी सांगितले.
कंसन यांनी सुरूवातीला गोंदिया रेल्वे स्थानकाचे निरीक्षण केले. त्यांनी अधिकाऱ्यांकडून विविध माहिती जाणून घेतली तसेच अनेक प्रश्नही त्यांना विचारले. यानंतर पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी गोंदिया रेल्वे स्थानकासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करविणार असल्याचे सांगितले.
सध्याच्या व्यवस्थेत सर्वात महत्वपूर्ण प्रश्न असलेल्या लिफ्ट व एस्कलेटरच्या कामाबाबत त्यांनी सांगितले की, आॅगस्ट महिन्यापर्यंत लिफ्टचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर एस्कलेटरसुद्धा लावले जाईल. परंतु जोपर्यंत एफओबीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत एस्कलेटर सुरू करण्यात येणार नाही. त्यांनी सध्या काही दिवस काम बंद असल्याचे मान्य केले. त्यासाठी रेती उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले. रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागात शेड बांधकाम केले जात आहे. हे काम एप्रिल महिन्यात पूर्ण होण्याची हमीसुद्धा त्यांनी दिली.
बालाघाटचा दौरा केल्यानंतर दुपारी गोंदियात पोहोचलेले कंसल यांनी सांगितले की, येणाऱ्या जून महिन्यात जबलपूरवरून ट्रेन नैनपूरच्या दिशेने सुरू होईल. गोंदिया ते चंद्रपूर मार्गावर विद्युतीकरणाचे काम तीव्र गतीने सुरू आहे. हे काम नागभीडपर्यंत पूर्ण झाले आहे. गोंदिया रेल्वे स्थानकातील मालगोदामचे स्थानांतरण हिरडामाली रेल्वे स्थानकाजवळ करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातून काही उत्तर आले नाही. एकदा पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. जर हिरवी झेंडी मिळाली तर मालगोदाम हिरडामालीला पाठविण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी नगर परिषदेने तयारी दाखविली होती. परंतु हे प्रकरण पुढे वाढू शकले नाही. स्थानक परिसरात तयार करण्यात आलेले मल्टीफंक्शनल कॉम्प्लेक्स अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली होती, परंतु कुणीही टेंडर भरण्यात रूची दाखविली नाही. आता पुन्हा नवीन टेंडर जाहीर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तिसरी रेल्वे लाईन बनविण्याच्या प्रकरणात त्यांनी सांगितले की, सध्या राजनांदगावपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. लवकरच गोंदियापर्यंतचा सर्वे केला जाणार आहे. (प्रतिनिधी)

- पाण्यावर होईल प्रक्रिया
४ गोंदिया रेल्वे स्थानकाच्या घाण पाण्यावर प्रकिया करण्याची माहिती देताना कंसल यांनी सांगितले की, पाणी रिसायक्लिन करण्याच्या कामाची प्रक्रिया जुलै-आॅगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होईल. सदर पाणी रेल्वे धुणे व साफसफाईच्या कामासाठी उपयोगात आणले जाणार आहे.
४ गोंदिया रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याचे प्याऊ स्वयंसेवी संस्था लावतात. ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांपर्यंत पाणी पोहोचविले जाते. यात गोंदिया प्रसिद्ध आहे. प्रवाशांना पाणी पोहोचविण्यास आपला विरोध नाही, परंतु पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सुरू करण्यात येईल व जर पाणी पिण्यायोग्य आढळले नाही तर ते बंद करण्यात येईल. प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येवू नये, हा उद्देश असल्याचे कंसल यांनी सांगितले.

तिरोड्यात ‘विदर्भ’च्या थांब्याचा प्रस्तावच नाही!
४सध्या काही स्थानकांवर नव्याने थांबे देण्यात आले आहेत. परंतु सदर प्रस्ताव त्यांच्या विभागाच्या माध्यमातून गेले नाही. असे सांगत आलोक कंसल म्हणाले, तिरोडा येथे विदर्भ एक्सप्रेसच्या थांब्याचा कसलाही प्रस्ताव त्यांंना आतापर्यंत मिळाला नाही. या थांब्यासाठी संसदेत असलेल्या आपल्या लोकप्रतिनिधींशी (खा.नाना पोटले) बोलावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
आणखी ५५ सीसीटीव्ही कॅमेरे लागणार
४सद्यस्थितीत गोंदिया रेल्वे स्थानकावर ३० कॅमेरे प्रवाशी व स्टेशन परिसराच्या सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आले आहेत. परंतु सदर कॅमेरे गोंदिया स्थानकाचा विस्तार बघता अत्यल्प आहेत. त्यासाठी पुन्हा ५५ नवीन कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव मंजूर आहे. सदर कॅमेरे पाच-सहा महिन्यांत लावण्यात येतील.

Web Title: Gondia's railway station will become 'ideal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.