जिल्ह्यातील २५० कोतवालांनी केले गोंदियात धरणे आंदोलन
By admin | Published: October 10, 2015 02:20 AM2015-10-10T02:20:36+5:302015-10-10T02:20:36+5:30
आपल्या विविध मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्ह्यातील २५० कोतवालांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
चतुर्थ वेतनश्रेणी द्या: जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
गोंदिया : आपल्या विविध मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्ह्यातील २५० कोतवालांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात आमगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिरोडा व गोंदिया या तालुक्यातील २५० कोतवालांचा समावेश होता. कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, सेवानिवृत्त कोतवालांना व मृत पावलेल्या कोतवालांच्या विधवा पत्नींना किमान ३ हजार रूपये निर्वाह भत्ता देण्यात यावा, कोतवालाच्या वारसानांच्या रिक्त जागेवर नियुत्या देऊन सन्माननो जगण्याची संधी द्यावी, कोतवालांचे मानसिक, आर्थिक व शारिरिक शोषण थांबविण्यात यावे, कोतवालांना जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी तोंडी लेखी आदेश देऊन गैरमार्गाची कामे केली जातात. ती बंद करण्यात यावी या मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाला पोलीस पाटील संघटनेने पाठींबा दर्शविल्याचे राज्य उपाध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष नंदलाल शहारे, परमानंद मेश्राम, रमेश कुंभरे, रेवी रामटेके, किशोर डोंगरे, नरेश कराडे, माणिकचंद रामटेके, गोपाल वलथरे, राजेंद्र टेंभूर्णेकर, सेवक बोरकर, विदेश साखरे, गिरधारी उके व इतर होते.