गोंदिया जिल्ह्यात सेल्फीच्या नादात दोन तरुणींना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:38 PM2018-07-31T13:38:30+5:302018-07-31T13:39:39+5:30
बाघ नदीच्या पात्रालगत मैत्रिणीसह सेल्फी घेताना पाय घसल्याने दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.३०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाघ नदीच्या पात्रालगत मैत्रिणीसह सेल्फी घेताना पाय घसल्याने दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.३०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही तरुणींचे मृतदेह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने नदीतून बाहेर काढण्यात आले.
मेघा सुखदेव शहारे (२१) रा.खमारी व समता कन्हैयालाल न्यायकरे (२०) रा. गिरोला दासगाव अशी मृत तरुणींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार गोंदियाच्या मरारटोली येथील युवा परिवर्तन संस्थेत नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या समता न्यायकरे, मेघा शहारे यांच्यासह त्यांच्या मैत्रिणी वर्ग सुटल्यानंतर बाघ नदीच्या कोरणी घाटावर फिरायला गेल्या होत्या. समता व मेघा नदीच्या काठावर एका दगडावर उभ्या राहून सेल्फी घेत होत्या.
सेल्फी घेतांना दोघींचाही पाय घसरल्याने त्या नदीच्या खोल पाण्यात बुडाल्या. दूर उभ्या असलेल्या त्यांच्या मैत्रिणीनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. मात्र नदीत पाणी अधिक असल्याने त्यांचा शोध वेळीच घेता आला नाही.
घटनेची माहिती गोंदियाचे तहसीलदार भंडारी व रावणवाडीचे ठाणेदार सचिन सांडभोर यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. दोन्ही विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूची मदत घेण्यात आली. या घटनेमुळे खमारी व गिरोला गावात शोककळा पसरली आहे. रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
धोकादायक स्थळी सेल्फी घेणे टाळा
अलीकडे तरुणी-तरुणींमध्ये सेल्फी घेण्याची क्रेज प्रचंड वाढली आहे. नदीच्या काठावर व धरणाजवळ सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. यानंतरही याबाबत युवक-युवती धडा घेत नसल्याचे दिसते. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे असा बोर्ड बाघ नदीच्या पात्रालगत सुध्दा लावण्यात आला आहे. मात्र यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.