गोंदियात प्रदूषण मोजणारे यंत्रच नाहीत
By Admin | Published: June 5, 2017 12:55 AM2017-06-05T00:55:04+5:302017-06-05T00:55:04+5:30
जिल्ह्यात मोठे उद्योग नसले तरी लघुउद्योगात मोडणाऱ्या आणि जिल्हाभर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या राईस मिल्समुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास : राईस मिल्सची तपासणी अधिकाऱ्यांच्या मनमर्जीने
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मोठे उद्योग नसले तरी लघुउद्योगात मोडणाऱ्या आणि जिल्हाभर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या राईस मिल्समुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र दूषित गोंदियाचे प्रदूषण किती आहे हे जाणून घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे गुणवत्ता मोजणारे यंत्रच नाही. प्रदूषण आणि पर्यावरणाच्या बाबतीत सरकार विविध उपाययोजना करीत असताना गोंदियातील प्रदूषणाकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे ‘अर्थपूर्ण’ संबंध कारणीभूत असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे याकडे आतापर्यंत जिल्हा प्रशासनानेही कधी गांभिर्याने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.
‘रेड’ मार्क असलेल्या उद्योगांची महिन्यातून दोन वेळा तपासणी करून त्या संदर्भातील सूचना संबधित कंपनीला दिली जाते. गोंदियात अदानी व टीम फेरो या दोन उद्योग कंपन्यांची तपासणी दर महिन्याला केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यात २६० राईस मिल्स असून त्यांची गेल्या दोन वर्षापासून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणीच झालेली नाही. राईस मिल्समधून फक्त धानाची मळणी करून तांदूळ बनविणाऱ्या २०० तर उष्णा तांदूळ तयार करणाऱ्या ६० राईस मिल्स आहेत.
तांदूळ तयार करणाऱ्या राईस मिल्सना प्रदूषण मंडळ प्लेन लि तर उष्णा तांदूळ काढणाऱ्या मिल्सना पॅरामीट राईस मिल म्हणून संबोधतात. या राईस मिलमुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. या राईस मिलपासून होणाऱ्या प्रदूषणाची गुणवत्ता मोजणारे यंत्र गोंदिया शहरात नाही. गोंदिया जिल्हा निर्मीती होऊन १६ वर्षाचा कालावधी लोटला, मात्र गोंदियात अजूनही प्रदुषण मापक यंत्रणा नाही. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे.
प्रदूषण मोजणारे केंद्र शासनातर्फे देण्यात आले नाही. त्यासाठी प्रस्तावही पाठविण्यात आला नाही. दिवसेंदिवस गोंदियात वाहनांची गर्दीही वाढत आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होणे साहजिकच आहे. राईस मिल्समधून निघणारा प्राणघातक वायू दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याची तपासणी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी येतच नाही. यावरून गोंदियातील राईस मिल मालक व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याची खात्री पटते.
वृक्षांची कत्तल व लागणाऱ्या आगी कारणीभूत
वाढत्या प्रदूषणाबरोबर सतत होणाऱ्या झाडांच्या कत्तलीमुळे जंगलाचे रूपांतर माळरानात होत आहेत. त्यामुळे संतुलन ढासळत आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणात वन जमिनीला आग लागली. जिल्ह्याच्या ४३ टक्के जमीनीवर वन आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात २५ हजारापेक्षा झाडांची कत्तल करण्यात आली. ही कारणे पर्यावरणाला घातक ठरत आहेत.
एकच व्यक्ती सांभाळते दोन जिल्हे
प्रदूषण नियंत्रण मंडळात चार पदे मंजूर असून फक्त उपप्रादेशिक प्रदूषण अधिकारी हे एकच अधिकारी कार्यरत आहेत. तीन फिल्ड आॅफीसरची पदे मंजूर असताना तिन्ही पदे रिक्त असल्याची माहिती आहे. रिक्त पदांमुळे मागील अनेक वर्षापासून गोंदियातील प्रदूषण किती आहे हे अधिकाऱ्यांना सांगताच येत नाही.
रेतीमाफियांमुळे ढासळतेय पर्यावरण
नद्यांमुळे जलस्तर वाढतो. नदीतील पाण्याला जमिनीत मुरविण्यासाठी त्या नदीतील रेती महत्वाची ठरते. परंतु अलीकडे रेतीचा उपसा करणारे कंत्राटदार पर्यावरण नियमांना बगल देत जेसीबीच्या सहाय्याने नदीतील रेती काढतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. बाराही महिने प्रवाहित असणारी वैनगंगा नदी यावर्षी कोरडी झाली. त्यामुळे रेती उपसा करणाऱ्या कंत्राटदारांनी या नदीची काय दुरवस्था केली आहे, याची कल्पना येते.