गोंदिया फेस्टीव्हलनिमित्त चित्रकला व छायाचित्र स्पर्धा
By admin | Published: February 7, 2017 12:53 AM2017-02-07T00:53:08+5:302017-02-07T00:53:08+5:30
जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने गोंदिया फेस्टीवलचे औचित्य साधून येत्या १२ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सुभाष गार्डन येथे गोंडी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गोंदिया : जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने गोंदिया फेस्टीवलचे औचित्य साधून येत्या १२ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सुभाष गार्डन येथे गोंडी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण घरांच्या छायाचित्रांची स्पर्धा आयोजित केली असून त्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका आमंत्रित करण्यात आल्या आहेत.
गोंडी आदिवासी समाजाची विशिष्ट अशी चित्रकला आहे. या चित्रकलेचा प्रचार-प्रसार व्हावा, नवोदित चित्रकारांना सुध्दा ती अवगत व्हावी यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ४ डिसेंबर रोजी प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट येथे गोंडी चित्रकला कार्यशाळेचे आयोजन केले होते. चित्रकला विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षकांसह अन्य इच्छुक चित्रकारांसाठी या गोंडी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी व शिक्षकांनी सर्व साहित्य सोबत आणायचे आहे. समितीमार्फत चित्र काढण्यासाठी ड्रॉर्इंग शिट पुरविण्यात येणार असल्याचे आयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले.
घरांची छायाचित्र स्पर्धा
नैसर्गिक संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील घरे देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. उतरती छपरे, त्यावर गोल कवेलू, छपरांना चारही बाजूंनी दिलेला उतार व तीन टप्प्यात विभागलेले छप्पर आणि तीन विभागात विभागलेली घरे हे जिल्ह्यातील घरांचे वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागात सर्वत्र सुंदर, मातीनी सारवलेली, त्यापुढे बांधलेले बैल, धानाचे पुंजणे आणि अंगणात खेळणारी मुले हे दृष्य फार नयनरम्य असून ते जिल्हाभरात सर्वत्र पहायला मिळते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्ह्यातील संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी तसेच वाढत्या शहरीकरणामुळे दुर्मिळ होत असलेल्या ग्रामीण घरांचे वैभव छायाचित्राच्या रुपाने जतन करु न ठेवण्यासाठी या घरांच्या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि स्वस्त दुकानदार यांना फोटो काढण्याचे विशेष आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे. हे फोटो १० फेब्रुवारीपर्यंत पाठवावे, असे जिल्हा माहिती अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.