गोंदियाला मिळणार कारागृह
By admin | Published: February 13, 2016 01:11 AM2016-02-13T01:11:11+5:302016-02-13T01:12:17+5:30
जिल्हा निर्मितीला १७ वर्षे होत असतानाही गोंदियासारख्या जिल्ह्यात तुरूंग (कारागृह) नसल्याने येथील आरोपींना भंडारा येथील कारागृहात न्यावे लागत होते.
कारंजात जागेची निवड : १७ वर्षांपासूनची प्रतीक्षा, आरोपींना भंडाऱ्याला नेण्याचा त्रास वाचणार
नरेश रहिले गोंदिया
जिल्हा निर्मितीला १७ वर्षे होत असतानाही गोंदियासारख्या जिल्ह्यात तुरूंग (कारागृह) नसल्याने येथील आरोपींना भंडारा येथील कारागृहात न्यावे लागत होते. त्यामुळे शासनाच्या पैशाचा आणि वेळेचाही अपव्यय होत होता. अखेर अनेक वर्षाच्या मागणीनंतर आता गोंदियात कारागृह तयार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
गोंदिया जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यापेक्षा गुन्ह्याचे प्रमाण जास्त आहे. महिन्याकाठी १२५ ते १५० च्या घरात आरोपींना गोंदियातून भंडारा येथील कारागृहात पाठविले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. त्यातच वाहन व्यवस्था करावी लागते. त्यासाठी लागणारे इंधन ही सर्व परिस्थिती पाहता गोंदियात कारागृह करणे गरजेचे झाले आहे. गोंदियातील आरोपीना भंडारा येथे नेत असताना कुणी आरोपी पसार होऊ नये किंवा त्याने वाहनातून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करू नये यासाठी त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. आरोपी पळून गेल्यामुळे अनेक पोलीस शिपाई निलंबितही झाले आहेत.
हा सर्व त्रास दूर करण्यासाठी गोंदियात कारागृह तयार करणे गरजेचे होते. शासनाने सन २०११-१२ मध्ये गोंदियात ‘वर्ग एक’चे कारागृह तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. त्यानंतर जागा पाहण्याच्या हालचाली भंडारा जिल्हा कारागृह कार्यालयाकडून झाल्या. परंतु अधीक्षक बदलून गेले व वर्ग एकचे कारागृह तयार करण्याचा प्रस्ताव तसाच पडून राहीला.
भंडारा जिल्हा कारागृह अक्षीक्षक म्हणून अनुपकुमार कुंभरे नोव्हेंबरमध्ये रूजू झाले. त्यानंतर मंत्रालयातील नगररचना कार्यालयाने गोंदियात वर्ग दोनचे कारागृह तयार करण्यास मंजूरी देत त्यासाठी जागा पाहण्याचा आदेश काढला. त्यानुसार डिसेंबर ४ व ५ तारखेला भंडारा कारागृह अधीक्षकांनी जागेची पाहणी केली. गोंदियाच्या पोलीस मुख्यालयामागील जागेत कारागृह तयार करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. त्या संबंधात अंदाजपत्रक आराखडा तयार करून त्याला खर्च किती येणार याचा अहवाल शासनाने मागितला आहे. तो आराखडा तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. तो आराखडा शासनाकडे गेल्यावर त्यासाठी निधी मिळणार आहे.
३०० आरोपींची क्षमता
गोंदिया जिल्ह्यातील आरोपींना या कारागृह ठेवण्यात येणार आहे. या तरूंगात २५० ते ३०० कैदी ठेवण्याची क्षमता राहणार आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील आरोपींना आता भंडाराच्या कारागृह नेण्याचा पोलिसांचा त्रास वाचणार आहे.
गोंदियात वर्ग एकचे कारागृह तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र आता याच कारागृहाला वर्ग दोनचे कारागृह करण्यात यावे अशा सूचना शासन स्तरावरून करण्यात आल्या. त्यामुळे यामागचे कारण नेमके काय, हे मात्र गुलदस्त्यात आहे.