गोंदियात ६२.७२ तर तिरोड्यात ७३.१५ टक्के

By admin | Published: January 9, 2017 12:43 AM2017-01-09T00:43:46+5:302017-01-09T00:43:46+5:30

नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी गोंदिया व तिरोड्यात शांततेत मतदान पार पडले.

Gondiya has 62.72 and 73.15 percent in Tiroda | गोंदियात ६२.७२ तर तिरोड्यात ७३.१५ टक्के

गोंदियात ६२.७२ तर तिरोड्यात ७३.१५ टक्के

Next

मतदानाची टक्केवारी घसरली : नगर परिषद निवडणुकीसाठी शांततेत पार पडले मतदान
गोंदिया : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी गोंदिया व तिरोड्यात शांततेत मतदान पार पडले. गोंदियात अपेक्षेच्या तुलनेत बरेच कमी म्हणजे अवघे ६२.७२ टक्के मतदान झाले, तर तिरोड्यात ७३.१५ टक्के मतदान झाल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले.
या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह नगरसेवकपदाच्या उमेदवारांची राजकीय भविष्य मतदान यंत्रणात लॉक झाले. सोमवारी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत बहुतांश निकाल जाहीर होतील.नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अशोक इंगळे, काँग्रेसचे राकेश ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक उर्फ गप्पू गुप्ता यांच्यात प्रमुख लढत आहे. त्यातच बहुजन समाज पार्टीचे पंकज यादव किती मते घेतात आणि कोणाचे गणित बिघडवतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
रविवारी गोंदियात १४३ मतदान केंद्रांवरून मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी काही वेळ मतदानाचा उत्साह दिसून आला. त्यानंतर दुपारपर्यंत मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता. सायंकाळी ४ नंतर मात्र पुन्हा गर्दी वाढू लागली. काही केंद्रांवर तर सायंकाळी ५.३० वाजता मोठी रांग असल्यामुळे त्या सर्वांना केंद्राच्या आवारात घेऊन फाटक बंद करण्यात आले. नंतर त्यांचे मतदान सायंकाळी ७ पर्यंत सुरू होते.
मागील २० दिवसा नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच जोर पकडला होता. गोंदियात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसीलदार हिंगे, मेश्राम यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. एकूण ५७२ कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली होती.
गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गोंदिया शहरातील ३ प्रभाग अतिसंवेदनशील तर ४ प्रभाग संवेदनशील असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असल्याने त्या केंद्रावर पोलिसांची करडीनजर होती.
गोंदिया शहराच्या १४ प्रभागांसाठी १४३ मतदार केंद्र तर रामनगरच्या सात प्रभागासाठी ४७ मतदान केंद्र, तर तिरोड्याच्या तीन प्रभागासाठी १६ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. परंतु पोलीसांनी प्रभाग क्र. १, १२ व १३ ला अतिसंवेदनशील ठरविले आहे. त्या प्रभागात मरारटोली, नप शाळा, रामनगर हिंदी शाळा, रामनगर म्युनिसिपल शाळा, सूर्याटोला संत गाडगेबाबा शाळेत असलेले केंद्र अतिसंवेदनशील आहेत. संवेदनशील केंद्रामध्ये ५, ९, १०, ११ या प्रभागांचा समावेश आहे. या प्रभागातील सर्वच केंद्रावर करडी नजर होती. गोंदिया शहरात शांततेच्या मार्गाने नगर परिषदेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक गटामागे एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक व २५ कर्मचारी असा चोख बंदोबस्त लावला होता. सोमवारी मतमोजणीसाठी पोलीस तैनात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

आज मतमोजणी
४सोमवारी (दि.९) सकाळी १० वाजतापासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. ही मतमोजणी दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्यात प्रभाग क्रमांक १ ते ११ पर्यंत ११ टेबलवरून मतमोजणी होणार आहे.
४दुसऱ्या टप्यात प्रभाग क्रमांक १२ ते २१ पर्यंतची मतमोजणी होणार आहे. सोबतच नगराध्यक्षपदासाठीची मतमोजणी सुरू राहणार असून त्याचा निकाल मात्र सर्वात शेवटी घोषित केला जाणार आहे.त्यामुळे निकालाची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहणार आहे.

Web Title: Gondiya has 62.72 and 73.15 percent in Tiroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.