गोंदियात केकेडी दलम सदस्य जगदीशचे आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 10:53 AM2019-05-28T10:53:59+5:302019-05-28T10:55:23+5:30
महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड विभागांतर्गत गोंदिया-राजनांदगाव-बालाघाट येथे कार्यरत नक्षलवाद्यांच्या केकेडी दलम सदस्य जगदीश उर्फ महेश उर्फ विजय अगनू गावडे (२७) याने आत्मसमर्पण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड विभागांतर्गत गोंदिया-राजनांदगाव-बालाघाट येथे कार्यरत नक्षलवाद्यांच्या केकेडी दलम सदस्य जगदीश उर्फ महेश उर्फ विजय अगनू गावडे (२७) याने आत्मसमर्पण केले. पोलीस अधीक्षक विनीता साहू व अतिरीक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी याची सोमवारी (दि.२७) पत्रकार परिषदेत माहिती दिली.
जगदीशवर सहा हिंसक घटनांत सहभागी असल्याचा आरोप आहे. यात छत्तीसगड राज्यातील भावे गावाजवळ झालेल्या चकमकीमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. जून २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील फुलगोंदी, आॅक्टोबरमध्ये लेकुरबोडी तसेच कैमुल येथील हिंसक घटनेतही तो सहभागी होता. कैमुल येथील फायरिंगमध्ये तो जखमी झाला होता. तर चार महिला नक्षलींना पोलिसांनी पकडले होते. सन २०१३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील टिप्पागड फायरिंगमध्येही तो सहभागी होता. बालाघाट जिल्ह्यातील बगरझोलामध्ये नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या चकमकीमध्ये त्याचा समावेश होता.या घटनेत एक नक्षलवादी ठार तर दोघे जखमी झाले होते. सन २०१२ मध्ये नक्षल आंदोलनात सहभागी झालेला जगदीश सुरूवातीला कोरची दलममध्ये सक्रीय होता. त्याचे काम बधून त्याला माओवादींच्या केंद्रीय कमिटी सदस्य मिलींद तेलतुंबडे याने स्वत:च्या सुरक्षेसाठी नियुक्त केले होते. सद्यस्थितीत तो विस्तार पीएल-३ सदस्य म्हणून कार्यरत होता. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्याच्या पुनर्वसनाचे प्रयत्न केले जाईल. राज्य शासनाकडून आत्मसमर्पण करणाºया नक्षलवाद्यांना अडीच लाख रूपये रोख दिले जातात. केंद्र शासनाकडून त्वरीत मदत म्हणून अडीच लाख रूपये दिले जातात. अशाप्रकारे पाच लाख रूपये तसेच शिक्षण, रोजगार-स्वयंरोजगारासाठी कर्ज, भूखंडासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
२२ तरूणांना बनविले नक्षलवादी
जगदीशने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगीतले की, तो सन २०१२ मध्ये नक्षली चळवळीशी जुळला. तो आपल्या बहिणीकडे जात होता. यादरम्यान काही जणांसोबत त्याची ओळख झाली व त्यांच्यात काय होते हे जाणून घेण्याची जिज्ञासा वाढली. गावात नक्षलवादी सभेसाठी आले असता त्यांच्यासोबत तो निघून गेला. १५ दिवस त्यांच्यासोबत राहून परत येण्याची मागणी केली असता त्याला भिती दाखवून थांबवून घेण्यात आले.या दरम्यान त्याने २२ तरूणांना नक्षल आंदोलनात जोडले. त्यांच्याशी बोलणे झाल्यास तो त्या तरूणांनाही देशाच्या मुख्य धारेशी जोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगीतले. सध्या ते सर्व बोडला दलममध्ये कार्यरत आहेत. नक्षलवाद्यांकडे पोलिसांकडून हिसकाविलेले शस्त्र असल्याचे त्याने सांगीतले.सध्या कोरची दलममध्ये १० सदस्य असून त्यात तीन महिला असल्याची माहिती त्याने दिली.पोलिसांच्या सुरक्षेत देवरी येथे राहण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. त्याचे तीन भाऊ, बहीण व आई असून सन २०१२ नंतर त्यांच्याशी आतापर्यंत भेट झालेली नाही. नक्षलवादी म्हणून पळापळ करण्यात आता तो थकला.अशात स्वत:चे भविष्य अंधारात पाहून आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगीतले.