गोंदियावासीयांना मिळणार एकवेळ पूर्ण पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 08:08 PM2018-04-25T20:08:40+5:302018-04-25T20:08:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शहराला एका वेळेला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पहिल्यांदाच ९० किलोमीटर अंतरावरील पुजारीटोला धरणातून बाघ नदी पात्रात पाणी आणले आहे. सध्या डांगोरली घाटात १५ कोटी लिटर पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गोंदियावासीयांना यापुढे दिवसाला एका वेळेला नियमति पाणी पुरवठा केला जाणार आहे .
गोंदिया शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातून वाहणाऱ्या बाघ नदीवर डांगोर्ली गावात उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून गोंदिया शहरातील १३ हजार घरांना दररोज १ कोटी लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे नदी पात्रातील पाणी आटले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि गोंदिया नगर परिषदेसमोर पाणी प्रश्न पेटले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन यंदा बिघडणार असल्याचे लक्षात घेऊन नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांची जानेवारी महिन्यापासून या समस्येवर तोडगा काढण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्याशी पाण्याच्या नियोजनसंबंधी चर्चा सुरू होती.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विद्युत विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याशी अनेकवेळा संयुक्त बैठका नगर पालिकेने घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून डांगोरली घाटातील पाण्याचे स्तोत्र आटल्यामुळे शहरात फक्त १० मिनिटे पाणी सोडण्यात येत होते. नगर पालिकेच्या विनंतीला मान देत आणि गोंदिया शहरातील पाणी संकट टाळण्यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेत डांगोरली घाटापासून ९० किलोमीटर दूर असलेल्या पुजारीटोला धरणातील पाणी सोडण्यास परवानगी दिली. त्याकरिता ९ किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्यात आला. १०० क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू झाला. आजघडीला डांगोरली घाटात १५ हजार कोटी लिटर पाणी जमा झाले आहे.
गोंदिया शहरात असलेल्या तब्बल १३ हजार नळ कनेक्शन धारकांना सध्याच्या घडीला दर दिवशी दोन वेळा पाणी पुरवठा करण्यासाठी १ कोटी लिटर पाणी लागत आहे. सद्यस्थितीत चार दिवसांत १०० क्यूसेकच्या गतीने सोडण्यात आलेला १५ कोटी लिटर पाणी नदी पात्रात तयार करण्यात आलेल्या बंधाºयात जमा झाले आहे. एक महिना एका वेळेला पुरेल इतके पाणी नदी पात्रात जमा झाले असून लवकरच पाणी पातळी वाढताच दोन वेळेला देखील पाणी पुरवठा सुरळीत करू, असा विश्वास नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी व्यक्त केला आहे.
जिलाधिकारी काळे आणि नागरध्यक्ष इंगळे यांनी रविवारी (दि.२२) डांगोरली घाटाची संयुक्त पाहणी केली. घाटात आलेल्या पाण्याचे दोघांद्वारे संयुक्त जलपूजन करण्यात आले. उपसा सिंचन योजनेतून पाण्याची उचल करण्यात येत असून पुढच्या वर्षी भविष्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी बाग नदीवर पाणी अडविण्यासाठी मोठा बंधारा बांधण्यात यावे, याकरिता जिलाधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेंट घेऊन सदर बंधारा त्वरित बांधन्यात यावे या करिता निवेदन करणार आहेत.
नगराध्यक्ष अशोक इंगले यांनी सदर बंधारा उंच करण्याकरिता निवेदन केले असता जिल्हाधिकारी यांनी सदर बंधारा दोन फूट उंच करण्याकरिता त्वरित आदेश दिले. येत्या काळात पाण्याची भीषणता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून आणि गरजेपुरताच करावा, असे आवाहन नगर परिषदेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी केले.
या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे चंद्रिकापुरे, पालिकेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, भाजपचे जिल्हा सचिव अमृत इंगळे, पालिकेचे सदस्य दिलीप गोपलानी, विवेक मिश्रा, चंद्रभान तरोने, सतीश मेश्राम, महेंद्र माने, राहुल लोहाना, अजिंक्य इंगळे, योगेश गिरीया, सुमित तिवारी, नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुजारीटोला धरणाचे पाणी डांगोरलीत
शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी ९० किलोमीटर अंतर कापून पाणी आणण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. डांगोरली घाटापासून ९० किलोमीटर दूर अंतराच्या पुजारीटोला धरणातील पाणी डांगोरली घाटात सोडण्यासाठी ९ किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्यात आला. त्यानंतर १०० क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू झाला. आज डांगोरली घाटात १५ हजार कोटी लिटर पाणी जमा झाला.