‘शिक्षणाच्या हक्का’त गोंदिया राज्यात अव्वल
By admin | Published: March 30, 2017 01:06 AM2017-03-30T01:06:35+5:302017-03-30T01:06:35+5:30
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील .......
विद्यार्थ्यांना लॉटरीतून मोफत प्रवेश : १,२०,४२८ जागांसाठी १,४३,७५७ अर्ज, ४५,१९९ विद्यार्थ्यांना लाभ
नरेश रहिले गोंदिया
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद केली. शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यातील ८ हजार २६४ शाळांमध्ये एक लाख २० हजार ४२८ जागा राखीव करण्यात आल्या. या जागांसाठी राज्यातील एक लाख ४३ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन वेळा झालेल्या सोडतीनंतर ४५ हजार १९९ विद्यार्थ्यांनी पुढील सत्रासाठी अॅडमीशन घेतले आहे. अॅडमीशन घेण्यात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
पहिल्या व दुसऱ्या लॉटरीत या बालकांना प्रवेश मिळाला. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर एक एसएमएस पाठविण्यात आले. जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा, सामाजिक वंचित घटकातील पालकांचा जातीचा दाखला, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे १ लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागले. गोंदिया जिल्ह्याच्या १३० शाळांमध्ये ११९७ जागांसाठी प्रवेश द्यायचा होता. या जागांसाठी १ हजार ३९८ अर्ज करण्यात आले होते. त्यातील ८०४ विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन प्रवेश मिळवून घेतला. जिल्ह्यातील ६७.१७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविल्यामुळे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकात आला. त्या पाठोपाठ धुळे ६४.३७ टक्के असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. अकोला ६२.५५ टक्के, वर्धा ६१.०७ टक्के, अमरावती ५९.३८ टक्के, भंडारा ५८.३४ टक्के, यवतमाळ ५६.५२ टक्के, नागपूर ५६.१५ टक्के, अहमदनगर ४९.०७ टक्के, बीड ४५.६२ टक्के, पुणे ४५.५६ टक्के, उस्मानाबाद ४५.३० टक्के, नाशिक ४४.७० टक्के, नांदेड ४४.२९ टक्के, जळगाव ४३.५१ टक्के, गडचिरोली ४१.९६ टक्के, सातारा ४१.१२ टक्के, बुलढाणा ४०.५६ टक्के, वाशिम ४०.३१ टक्के, चंद्रपूर ३८.०६ टक्के, रायगड ३६.८१ टक्के, जालना ३५.९६ टक्के, लातूर ३३.२१ टक्के, औरंगाबाद ३१.३३ टक्के, परभणी २९.२५ टक्के, सोलापूर २७.४५ टक्के, हिंगोली २५.९८ टक्के, मुंबई २४.०२ टक्के, नंदुरबार २३.२३ टक्के, ठाणे २१.०० टक्के, सांगली २०.९९ टक्के, सिंधुदुर्ग २०.४० टक्के, रत्नागिरी १९.१७ टक्के, कोल्हापूर १६.०३ टक्के व पालघर ९.३५ टक्के बालकांनी प्रवेश घेतला आहे.
२३ हजार ३२९ विद्यार्थ्यांना नो अॅडमिशन
राज्यातील ८ हजार २६४ शाळांमध्ये एक लाख २० हजार ४२८ विद्यार्थ्यांना राखीव होत्या. आॅनलाईन पध्दतीने लॉटरी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश द्याचे होते. ज्या विद्यार्थ्यांना जी शाळा मिळाली त्या शाळांत पालकांसोबत जाऊन विद्यार्थ्याचे नाव दाखल करायचे होते. राज्यातील एक लाख ४३ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. काहींनी प्रवेश घेतला तर काहींनी प्रवेश घेतला नाही. दोन वेळा झालेल्या सोडतीनंतर ४५ हजार १९९ विद्यार्थ्यांनी पुढील सत्रासाठी अॅडमीशन घेतले आहे. जागांपेक्षा अधिक २३ हजार ३२९ विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याने इतक्या संख्येतील विद्यार्थ्यांना आरटीई कायद्यांतर्गत प्रवेश देता येणार नाही.