गोंदियात पाणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:02 PM2018-04-11T22:02:06+5:302018-04-11T22:02:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्यानंतर पाणी टंचाईची संभाव्य स्थिती ओळखून जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वेळीच उपाय योजना केली नाही. परिणामी मागील चार दिवसांपासून शहराला होणार पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. तर गोंदियात प्रथमच पाणी बाणीची स्थिती निर्माण झाली आहे.
गोंदिया शहराची लोकसंख्या दोन लाखांवर असून शहराला डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची आहे. प्रती व्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे मजीप्रा ग्राहकांना दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा करते. मात्र जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले कोरडे पडले आहेत. तसेच भूजल पातळीत सुध्दा घट झाली आहे. तर यंदा वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. त्यामुळे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली. तर गेल्या चार पाच दिवसांपासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच केल्या जात नसल्याने पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. काही भागातील नळाला पाच मिनिटे पाणी येऊन ते बंद होत असल्याने दैनदिन वापरासाठी दूरवरुन पाणी आणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. शहरातील अनेक भागातील बोअरवेल नादुरुस्त आहेत तर सार्वजनिक विहिरींमधील गाळांचा उपसा न केल्याने त्यांनी देखील तळ गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील काही मोजक्या विहिरी आणि बोअरवेलवर महिलांची पाण्यासाठी गर्दी असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मागील २० ते २५ वर्षांत प्रथमच शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले असून याला जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जबाबदार असल्याची ओरड शहरवासीयांची आहे.
उपाययोजनेकडे दुर्लक्ष
भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हा प्रशासन आणि मजीप्रा यांना दिलेल्या अहवालानुसार यंदा शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. त्या दृष्टीने या दोन्ही विभागाने उपाय योजना करण्याची गरज होती. मात्र वेळ पडल्यास पुजारीटोला धरणाचे पाणी आणून शहरवासीयांची तहान भागवू असे घसा कोरडा पडेपर्यंत या दोन्ही विभागाच्या अधिनस्त अधिकाºयांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात वेळीच कुठलीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे.