प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात गोंदिया राहणार प्रथम
By admin | Published: February 15, 2016 01:52 AM2016-02-15T01:52:33+5:302016-02-15T01:52:33+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.
मार्चअखेर १०० टक्के शाळा : अप्रगत विद्यार्थ्यांना करणार प्रगत, ९९५ शाळांत ज्ञान रचनावाद उपक्रम
नरेश रहिले गोंदिया
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रगत महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून नावारूपास गोंदियाला आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १०४९ पैकी ९९५ शाळा ज्ञान रचनावादचे शिक्षण देत आहेत. फक्त पाच टक्के शाळा लवकरच या ज्ञान रचनावादात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांनी दिली आहे.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी आहे. अध्ययन संपादणूक सर्व्हेच्या अहवालानुसार अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त न झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढून शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवून आणण्याचा माणस बांधला आहे.
या उपक्रमाला कृतीत उतरवून राज्यात प्रगत शिक्षणात गोंदिया जिल्हा प्रथम असावा यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी नरड यांनी २०० शाळा दत्तक घेऊन तसेच गटशिक्षणाधिकारी व अधिनस्त विस्तार अधिकारी, केंद्रप्रुख यांना दत्तक घेण्यास भाग पाडून त्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा माणस बांधला आहे.
या शाळांतील प्रत्येक बालक ज्ञानरचनावादी पध्दतीने शिकावे, अशी अपेक्षा आहे. लेखन, वाचन व गणित क्रिया बालकांंना प्राप्त करणे आवश्यक आहे. बालकांचा बहुमुखी विकास करण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेकांगी बदल करण्यात आले आहे. प्रत्येक शाळा सुंदर व समाजाभिमुख करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. मनोरम्य वातावरणात बालकांचे अध्ययन व्हावे यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले.
सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन
६ ते १४ वयातील बालकांना दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण देणे, १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शाळेत शैक्षणिक साहित्यावर भर, अप्रगत मुलविहीन शाळा करणे, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, कृतीद्वारा शिक्षण घेणे, कठिण विषयाविषयी आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती नाहीशी करणे, शाळा सुंदर व बोलक्या करणे, विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम या उपक्रमातून केले जाणार आहेत.