गोंदियाकरांना गाड्यांची, मात्र फॅन्सी नंबरची हौस नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:18 AM2021-06-30T04:18:59+5:302021-06-30T04:18:59+5:30

गोंदिया : ‘धानाचे कोठार’ म्हणून अवघ्या देशात ख्याती असलेल्या तसेच राज्यात ‘मिनी मुंबई’ म्हणून ओळख असलेल्या गोंदिया शहर व ...

Gondiyakars have no desire for cars, but fancy numbers | गोंदियाकरांना गाड्यांची, मात्र फॅन्सी नंबरची हौस नाहीच

गोंदियाकरांना गाड्यांची, मात्र फॅन्सी नंबरची हौस नाहीच

Next

गोंदिया : ‘धानाचे कोठार’ म्हणून अवघ्या देशात ख्याती असलेल्या तसेच राज्यात ‘मिनी मुंबई’ म्हणून ओळख असलेल्या गोंदिया शहर व जिल्ह्याची आपली वेगळीच शान आहे. पर्यटन, तलावासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा नेहमीच चर्चेत असतो. त्यातच आता आपली हौस पूर्ण करण्यासाठी वाटेल ते काहीही करणाऱ्यांची संख्याही येथे कमी नाही. जिल्हावासीयांना गाड्यांची हौस आहे व गाड्यांसाठी फॅन्सी नंबरवर पैसा खर्च करण्यात हौस नसल्याचे एक वैशिष्ट्य मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीतून उघडकीस आले आहे. अन्य ठिकाणी जेथे लोकं गाड्यांच्या नंबरसाठी लाखो रूपये उधळतात. तेथेच मात्र गोंदियाकर गाड्यांच्या नंबरसाठी नाहक पैसा खर्च करण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे दिसले. हेच कारण आहे की, फॅन्सी नंबरची सुरूवात होत असलेल्या तीन लाखांचा नंबर आतापर्यंत कुणीही घेतलेला नाही. एवढेच नव्हे तर आतापर्यंत फक्त एकदाच नंबरसाठी लिलाव झाला असून १५ हजार रूपयांचा नंबर २२,५०० रूपयांत विकला गेला आहे.

-----------------------------

या तीन नंबर्सना सर्वाधिक मागणी

- ००८८

- ०१०१

-०२००

------------------------

या नंबरचा रेट सर्वात जास्त

- ०००१- तीन लाख रूपये

-०००९- दीड लाख रूपये

- ०००२- ७५ हजार रूपये

------------------------------

आरटीओ विभागाची झालेली कमाई

- २०१९ - १६,००,०००

-२०२०- १४,३६,०००

-२०२१ (मे पर्यंत) - ३,००,०००

---------------------------

कोरोना काळातही १४.३६ लाखांचे उत्पन्न

आजही कित्येक शौकिन असे आहेत की जे आपले शौक पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतात. काहींना असाच गाड्यांच्या फॅन्सी नंबरचा शौक असतो. आपल्या गाडीवर आपला लकी नंबर किंवा हटके नंबर असावा यासाठी ते पैसे मोजूनही तो नंबर खरेदी करून मिळवितात. जिल्ह्यातील काही शौकिनांनीही आपल्या वाहनांसाठी अशाच प्रकारे नंबर खरेदी केला आहे. विशेष म्हणजे, कोरोना सारख्या कठीण समयीही त्यांनी आपल्या शौकासाठी पैसे मोजल्याचे दिसते. यातूनच उपप्रादेशिक परिवहन विभागाने सन २०२० मध्ये १४,३६,००० रूपयांचे तर सन २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत ३ लाख रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

--------------------------------

फक्त एकदाच झाला लिलाव

जिल्ह्यात वाहनांच्या नंबरसाठी लाखो रूपये मोजणारे विभागाच्या रेकॉर्डवरून नाहीच दिसून येतात. तरीही काही जणांना आवडणारा किंवा त्यांना लकी वाटणारा नंबर काही हजारांच्या घरात असल्याने ते तो नंबर खरेदीसाठी पुढे येतात. असाच प्रसंग एकदा आला असून १५ हजार रूपयांच्या त्या नंबरसाठी दोन व्यक्तींमध्ये लिलाव करावा लागला होता. त्यात २२,५०० रूपयांत त्या नंबरची बोली लागली होती. हा एक प्रकार सोडल्यानंतर लिलावाची वेळ आलेली नाही.

-----------------------------

कोट

गोंदिया जिल्हा संपन्न असला तरीही येथे मोठे उद्योग धंदे व हायफाय राहणीमान नाही. अत्यंत साधे राहणीमान असल्याने वाहनांच्या नंबरसाठी लाखो रूपये मोजण्या इतपत येथील लोकांत उत्सुकता नाही. त्यामुळे जिल्ह्यात लाखो रूपये मोजून नंबर खरेदी करणारे नाहीच. मोठ्या शहरांमध्ये नंबरसाठी असलेली चढाओढ येथे नाही.

- विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,गोंदिया.

Web Title: Gondiyakars have no desire for cars, but fancy numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.