गोंदियाची ‘दालने’ ठरली लक्षवेधक

By admin | Published: November 26, 2015 01:45 AM2015-11-26T01:45:26+5:302015-11-26T01:45:26+5:30

विदर्भ नैसर्गिकदृष्ट्या संपन्न प्रदेश आहे. या भागातील वनसंपदा, ऐतिहासिक , प्राचीन, सांस्कृतिक, वन्यजीव पर्यटन, गड, किल्ले व मंदिरे आजही पर्यटकांना भेटीची ओढ लावत आहे.

Gondiya's "dalals" are striking | गोंदियाची ‘दालने’ ठरली लक्षवेधक

गोंदियाची ‘दालने’ ठरली लक्षवेधक

Next

कालिदास महोत्सव : पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शन, नवेगाव-नागझिरा, पर्यटक सारस, झिलमिली व शिल्पग्राम दालने
गोंदिया : विदर्भ नैसर्गिकदृष्ट्या संपन्न प्रदेश आहे. या भागातील वनसंपदा, ऐतिहासिक , प्राचीन, सांस्कृतिक, वन्यजीव पर्यटन, गड, किल्ले व मंदिरे आजही पर्यटकांना भेटीची ओढ लावत आहे. नागपूर विभागात येणाऱ्या गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा आणि नागपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील अभयारण्ये, वन्यजीव, प्राचीन मंदिरे, संस्कृती, हस्तशिल्पकला, टसर रेशिम वस्त्रे यांची ओळख व्हावी आणि जास्तीत जास्त पर्यटकांना पूर्व विदर्भातील पर्यटन व ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळण्यासाठी आकर्षक असे पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शन घेण्यात आले. यात गोंदिया जिल्ह्यातील ‘पर्यटक दालने’ प्रदर्शनात लक्षवेधक ठरली.
जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून नवेगाव-नागझिरा, पर्यटन सारस, झिलमिली, शिल्पग्राम ही चार दालने लावण्यात आली होती. अतिशय आकर्षक पद्धतीने ही दालने तयार करण्यात आली होती.
नवेगाव-नागझिरा दालनामध्ये युवा काष्टशिल्पकार महेंद्र निकोडे यांनी तयार केलेले कासव, वाघ, हरिण, मत्स्य, गरुड, गौतम बुद्धाची मूर्ती, वन विभागाच्या गोंदिया बांबू क्राफ्टने तयार केलेली परडी, फलदाणी, टेबल लॅम्प, पेन स्टॅन्ड, तसेच बांबूपासून तयार केलेली फाईल, सुटकेस, घड्याळ, नवेगाव-नागझिरा ब्रॅन्डचे टी शर्टस, टोप्या विक्रीस उपलब्ध होत्या. बिबट, अस्वल, वाघ, निलगाय, सांबर, हरीण हे वन्यप्राणी तर घुबड, मोर, मत्स्य, गरुड या पक्षांची छायाचित्रकारांनी काढलेली छायाचित्रे व नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचा नकाश या दालनामध्ये लावण्यात आला होता. या दालनाला भेट देवून पर्यटक गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेत होते.
पर्यटक सारस या दालनामध्ये छायाचित्रकारांनी काढलेले नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नीलगाय, रानगव्यांचा कळप, झाडावर बसलेला मत्स्य गरुड, मोर, ग्रेटर रॉकेट पक्षी, वाघ, सारस, अस्वल, बिबट, साप यांचे सुंदर छायाचित्र भेटी देणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. जंगलात आग लागली तर आग विझविणारे यंत्रही प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील वनसंपदा, वन्यप्राणी व पक्षी यांची माहिती देणारा माहितीपट दालनामध्ये भेट देणाऱ्या व्यक्तींना पहायला मिळत होते. त्यामुळे अनेकांची पाऊले आता या व्याघ्र क्षेत्राकडे भेटीसाठी निश्चित वळतील, याची खात्री झाली आहे.
झिलमिली या दालनामध्ये महाकवी भवभूती यांची जन्मभूमी असलेल्या जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील पदमपूरची माहिती, गोंदियाजवळील बिरसी येथील राष्ट्रीय उड्डान अकादमीविषयी माहिती, वनविकास महामंडळाकडून नागझिरा येथील लॉग हट, मधुकुंज, लताकुंज, उमरझरी, पर्यटक निवासी तंबू, नवेगावबांध येथील डिलक्स वातानुकुलीत विश्रामगृह, हॉलीडे होम्स येथील पर्यटकांच्या निवासाच्या सुविधांबाबतची सचित्र माहिती, देवरी या नक्षलग्रस्त भागातील चांदलमेटा येथील माविमच्या बचत गटाने लाख निर्मितीसाठी केलेली सेमिलता झाडांची लागवड, गोंदिया पाटबंधारे विभागाने चुलबंद, नवेगावबांध येथील संजय कुटी, मालडोंगरी बेट, बोदलकला प्रकल्प, इटियाडोह प्रकल्प, परसवाडा, तलावाचे सचित्र माहिती असलेल्या फ्लेक्सवरुन पर्यटक माहिती जाणून घेताना दिसत होते.
शिल्पग्राम या दालनामध्ये आदिवासी कला संस्था सालेकसा येथील शिल्पग्राममधील कारागिरांनी दैनंदिन वापरात येणाऱ्या हातांनी तयार केलेल्या विविध रंगाच्या कागदी पिशव्या, पेपर क्राफ्ट, फ्लॉवर पॉट, ग्रिटिंग्ज, इनव्हलप, फोटोफ्रेम आदी साहित्य पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी पर्यटकांनी या दालनापुढे एकच गर्दी केली होती. वेल कम टू गोंदियाचे फ्लेक्स हे पर्यटकांना गोंदियाला पर्यटनासाठी येण्याची साद देत होते.
जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया, वन्यजीव विभाग गोंदिया, वनविकास महामंडळ गोंदिया, वनविभाग गोंदिया यांनी काढलेल्या पर्यटनविषयक घडीपुस्तिका व पॉकेटबूक दालनाला भेट देणाऱ्या पर्यटकासाठी उपयुक्त ठरल्या.
जिल्ह्यातील विविध दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीनचे काऊन्सलेट जनरल चाँग आणि श्रीमती ली, चीनच्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बानकुळे, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, गोंदिया जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, भंडारा जिल्हाधिकारी धीरजकुमार, वर्धा जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने पर्यटकांनी या दालनाला भेट दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Gondiya's "dalals" are striking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.