गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:46+5:302021-06-09T04:36:46+5:30
गावागावांतील हातपंप नादुरुस्त साखरीटोला : गावागावांत असलेले बहुतांश हातपंप नादुरूस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर ...
गावागावांतील हातपंप नादुरुस्त
साखरीटोला : गावागावांत असलेले बहुतांश हातपंप नादुरूस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहेत. मात्र, ते नादुरूस्त असल्याने अडचणी वाढल्या आहेत. आता उन्हाळा चांगलाच तापायला सुरूवात झाली असून पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. याकडे तेथील ग्रामपंचायत कार्यालयाने लक्ष देऊन ते हातपंप दुरुस्त करणे गरजेचे आहे.
कार्यालयातून तक्रारपेट्या गायब
आमगाव : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. या हेतूने शासकीय कार्यालयात तक्रार पेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र, आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. अशात आता तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी
सडक - अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर कोहमारा गाव आहे. मात्र, कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा
सौंदड : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी आहे.
वातावरणातील बदलामुळे भीती
तिरोडा : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
बाजारातील रस्ते मोकळे करा
गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरूंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी रस्ते अडचण होते.
रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत
अर्जुनी-मोरगाव : राज्य मार्गालगत वाढलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी असलेल्या या झुडपांमुळे वाहन दिसत नाही. हे झुडूप अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची लागली वाट
रावणवाडी : गोंदिया तालुक्यातील बनाथर, कासा, तेढवा, जिरूटोला परिसरातील वाळूृघाटांचा लिलाव सुरू झाला नाही. तरीही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळूचे ट्रॅक्टर रात्रंदिवस धावत असल्याने गावकुसातील रस्ते उखडले आहेत. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे.
गोंदिया तालुक्यातील वाळूघाटांतून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन केले जात आहे. वाळू भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कासा, जिरुटोला, कोरणी, बनाथर, तेढवा रस्त्याची स्थिती खराब झाली आहे. विशेष म्हणजे वाळूमाफियांना महसूल विभागाचे अधिकारी कारवाईसाठी येत असल्याची माहिती सुरुवातीलाच मिळत असते. ते आपल्या जवळची व्यक्ती रावणवाडीपासून घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर तैनात करत असतात. हे व्यक्ती अधिकारी, कर्मचारी येत असल्याची सूचना माफियांना देत असतात. कधीकाळी सेटिंग करून कर्मचाऱ्यांना मोकळे करत असतात. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
प्रशासकीय अडचणीमुळे वाळूघाटांचा लिलाव झाला नसल्याचे बोलले जाते. वाळूमाफिया गावातील कच्चे रस्ते आणि पांगडी रस्त्यावरुन वाळूची वाहतूक करत असल्याने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.
निराधारांना मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव : कोरोना संसर्गाच्या काळात निराधारांना मानधनाची प्रतीक्षा कायम आहे. गत काही महिन्यांपासून निराधारांना मानधन मिळाले नाही. अनेकांची आज उपासमार होत आहे. बँकेत चौकशी करावी तर कोरोनामुळे बाहेर निघणेही कठीण आहे. अशा स्थितीत निराधार जीवन जगत आहे.
लाखनीत जनावरांचे रस्त्यांवर अतिक्रमण
तिरोडा : तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये रस्त्यावर गावांतील नागरिक जनावरे बांधतात. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होत आहे. नगरपंचायतने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज असताना दुर्लक्ष होत आहे.
प्रखर दिव्यांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पुढे हेडलाईट लावले जाते. मात्र, काही तरुण साधे दिवे न लावता निळ्या रंगाचे तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा तरुणांवर कारवाई करून अपघाताला आळा घालावा.
शहरातील पथदिवे बंद
गोंदिया : शहरातील विविध भागातील पथदिवे गत आठ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. आकर्षक पथदिवे लावण्यात आले. मात्र, देखभाल दुरूस्तीअभावी गत काही दिवसांपासून पथदिवे बंद असतात.