गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:19 AM2021-07-08T04:19:57+5:302021-07-08T04:19:57+5:30
गावागावांतील हातपंप नादुरुस्त साखरीटोला : गावागावांत असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर ...
गावागावांतील हातपंप नादुरुस्त
साखरीटोला : गावागावांत असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहेत. मात्र, ते नादुरुस्त असल्याने अडचणी वाढल्या आहेत. आता उन्हाळा चांगलाच तापायला सुरुवात झाली असून पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. याकडे तेथील ग्रामपंचायत कार्यालयाने लक्ष देऊन ते हातपंप दुरुस्त करणे गरजेचे आहे.
कार्यालयातून तक्रारपेट्या गायब
आमगाव : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. या हेतूने शासकीय कार्यालयात तक्रार पेट्या दिसायच्या. मात्र, आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत.
कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी
सडक - अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर कोहमारा गाव आहे. मात्र, कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा
सौंदड : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी आहे.
वातावरणातील बदलामुळे भीती
तिरोडा : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
बाजारातील रस्ते मोकळे करा
गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी रस्ते अडचण होते.
रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत
अर्जुनी-मोरगाव : राज्य मार्गालगत वाढलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी असलेल्या या झुडपांमुळे वाहन दिसत नाही. हे झुडपे अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
चिरामनटोला ते कटंगटोला मार्गावर पडले खड्डेच खड्डे
खातिया : गोंदिया तालुक्यातील चिरामनटोला ते कटंगटोला हा मार्ग पूर्णपणे उखडला असून त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षभरापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे समस्या कायम आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ
लाखनी : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला आहे. जवळपास दोन कि.मी. पर्यंतच्या महामार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान या मार्गावरून भरधाव वाहनांची वर्दळ सतत असते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली
गोंदिया : कोरोनाला हरविण्यासाठी ज्या प्रकारे राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत, त्याचप्रकारे जिल्हा पातळीवरही मोठ्या प्रमाणात कडक निर्बंध वाढविण्यात आले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांनंतर पहिल्याच दिवशी शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाली. सकाळच्या वेळी तर शहरातील बाजारपेठा व सर्वत्र गर्दीच गर्दी असे चित्र दिसून आले.
तालुकानिर्मितीसाठी दोन दशकांपासून संघर्ष
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग म्हणून केशोरी या गावाची जिल्ह्यात ओळख आहे. तालुकानिर्मितीसाठी आवश्यक असलेला परिसर व लोकसंख्या तथा भौगोलिक परिस्थिती तालुकानिर्मितीच्या निकषाची पूर्तता करीत आहे. यामुळे तालुकानिर्मिती व्हावी, यासाठी गेल्या दोन दशकांपासून सतत तालुकानिर्मिती संघर्ष समितीचा शासनाकडे लढा सुरू आहे; परंतु जे शासन सत्तेवर येते, ते आश्वासनाच्या लालिपॉपशिवाय काहीच देत नाही. यामुळे या भागातील नागरिक शासनाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.
अधिकाऱ्यांकडून गावागावात जनजागृती
साखरीटोला : कोविड चाचणीदरम्यान तालुक्यात नियमित मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना, नागरिकांकडून कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सदर परिस्थितीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करीत, खुद्द तालुका अधिकाऱ्यांकडून गावांमध्ये भोंगा वाजवून जनजागृती केली जात आहे. याला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकही स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत आहेत.
प्रवासी निवारा उभारा
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते, पण जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी प्रवासी निवारागृह असणे फार गरजेचे आहे. नवेझरी गावासाठी ही बाब फार खेदाची आहे. नवेझरी या गावी छोटीशी बाजारपेठ आहे. दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. गांगला परिसरातील १० ते १५ खेडेगावांचा समावेश येत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. करिता प्रवासी निवाऱ्याची मागणी आहे.