हस्तशिल्पकारांना येणार ‘अच्छे दिन’
By admin | Published: February 14, 2016 01:35 AM2016-02-14T01:35:47+5:302016-02-14T01:35:47+5:30
जिल्हयातील अनेक गावात बुरड समाजातील व्यक्ती परंपरागत पद्धतीने हस्तशिल्प तयार करतात. परंतू त्यांच्या कलाकृतींचे मार्केटिंग होत नाही.
तांत्रिक प्रशिक्षण देणार : रोजगार निर्मितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
गोंदिया : जिल्हयातील अनेक गावात बुरड समाजातील व्यक्ती परंपरागत पद्धतीने हस्तशिल्प तयार करतात. परंतू त्यांच्या कलाकृतींचे मार्केटिंग होत नाही. अनेक वेळा त्यांना कच्चे साहित्य मिळणेही कठीण जाते. मात्र आता त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त हस्तशिल्प गुणांना हेरून त्यांना आणखी चांगल्या प्रकारचे हस्तशिल्प निर्मितीचे प्रशिक्षण देवून यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला असून हस्तशिल्पात जिल्ह्याला नवीन ओळख देण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.
जिल्हयात हस्तशिल्पकला हे रोजगाराचे एक प्रमुख स्त्रोत म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने जिल्हा हस्तशिल्प विकास मंचाची स्थापना करण्यात आली. या मंचाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी असून जिल्हास्तरीय इतर अधिकारी व सेवाभावी संस्था त्यात सदस्य आहेत.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांच्या बचत गटांना यामध्ये समाविष्ट करुन, कारागिरांचे गट करु न त्यांना रोजगार देणे तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजना हस्तशिल्प कारागिर व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. कलात्मक वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न या मंचाकडून करण्यात येणार आहे.
जिल्हयात एकूण उपलब्ध कारागिर, मास्टर ट्रेनरची उपलब्धता याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले. नागझिरा अभयारण्याच्या चोरखमारा व मंगेझरी गेट, नवेगावबांधच्या जांभळी गेट व नगर परिषद येथे स्टॉल तसेच अदानी पॉवर गेस्ट हाऊस येथे हस्तशिल्प वस्तू विक्र ी केंद्र सुरु करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.(जिल्हा प्रतिनिधी)
- प्रदर्शन व विक्रीसाठी देणार जागा
कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, इतर शासकीय कार्यालयांच्या परिसरात जागा उपलब्ध करु न देण्यात येणार आहे. जिल्हयात हस्तशिल्पकलेचा विकास करण्याच्या दृष्टीने तसा प्रस्ताव महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ व विकास आयुक्त दिल्ली यांना पाठविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापण्यात आलेल्या मंचाच्या बैठकीत देशभर होणाऱ्या प्रदर्शनामध्ये स्थानिक कारागिरांना बाजारपेठ मिळावी व शासनाच्या विविध योजनांमधून निधी पुरविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
समन्वयासाठी हस्तशिल्प विकास मंच समिती
अनेक गावातील नागरिक व बुरड समाजातील व्यक्तींकडे मोठ्या प्रमाणात हस्तशिल्प कलेचे सुप्त गुण लपलेले आहेत. त्यांच्या गुणांना वाव देण्यासोबतच त्यांना रोजगार उपलब्ध करु न देण्यासाठी आणि हस्तशिल्प कला शिकण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तींसाठी या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हस्तशिल्प विकास मंच समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपवनसंरक्षक वनविभाग, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा माहिती अधिकारी, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, मुख्याधिकारी न.प., व्यवस्थापक खादी ग्रामोद्योग, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळ, व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, व्यवस्थापक लघु उद्योग विकास महामंडळ, बिरसा मुंडा कामगार संस्था, एएसकेएस संस्था सालेकसा, अंजली मागासवर्गीय बहूउद्देशिय संस्था सालेकसा, महिला महामंडळाचे प्रतिनिधी व प्रधानमंत्री ग्रामीण विकास फेलो हे या समितीचे सदस्य आहेत.