जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी
By admin | Published: January 18, 2015 10:47 PM2015-01-18T22:47:04+5:302015-01-18T22:47:04+5:30
जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी निवासी राहून चांगली सेवा द्यावी, असे मत पालकमंत्री राजकुमार
गोंदिया : जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी निवासी राहून चांगली सेवा द्यावी, असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. १७ जानेवारी रोजी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील धाबेपवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नाना पटोले, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, माजी आमदार कापगते, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मदन पटले, अर्थ व बांधकाम समिती सभापती प्रकाश गहाणे, पंचायत समिती सभापती तानेश ताराम, उपसभापती पोमेश्वर रामटेके, धाबेपवनीचे सरपंच डॉ. शैलेश भांडारकर, जिल्हा परिषद सदस्य मधुकर मरस्कोल्हे, अरविंद शिवणकर, उमाकांत ढेंगे, राजेश चांदेवार, पंचायत समिती सदस्य बुडगेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते उपस्थित होते.
पुढे बोलताना बडोले यांनी, या परिसरातील झाशीनगर येथे बंद असलेल्या आयुर्वेदीक दवाखान्याऐवजी आता तेथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरु करावे, या भागातील वनहक्क पट्टे धारकांना पट्टे वाटप करण्यासाठी महसुल विभागाने शिबिराचे आयोजन करावे व पट्यावरील सात-बारा हा व्यक्तींच्या नावे झाला पाहिजे. त्यामुळे त्याला विविध योजनांचा लाभ घेणे सोईचे होईल. धान उत्पादकांना आता प्रती हेक्टरी प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पहिल्या टप्यातील काम जवळपास पुर्ण झाले असून तीन महिन्याच्या आत या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.
आणेवारीची ब्रिटिशकालीन पद्धत बंद झाली पाहिजे अशी उपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री म्हणाले. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील युवक-युवतीना संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळावे यासाठी या परीक्षेची तयार करण्यासाठी नागपूर येथे लवकरच प्रशिक्षणाची व्यवस्था करणार. आदिवासी बांधवांसाठी पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण ही योजना योग्यप्रकारे राबविल्यास जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींना पोलीस विभागातील नोकरी मिळविता येणे शक्य होईल.
आदिवासी बांधवांसाठी पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण ही योजना योग्यप्रकारे राबविल्यास जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींना पोलीस विभागात नोकरी मिळविता येणे शक्य होईल असेही ते म्हणाले.
शिवणकर यांनी, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यसेवा चांगल्याप्रकारे देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे आरोग्याच्या सेवा देताना अडचणी येत आहे. आरोग्य विभागातील पदांना मान्यता मिळाली तर आरोग्य उपकेंद्रांना अधिकारी व कर्मचारी देता येईल असे सांगीतले. तर खासदार पटोले यांनी, मानवी जीवनासाठी आरोग्याच्या सेवा महत्वाच्या आहेत. जगाच्या पाठीवर आरोग्य सेवेत आपण बरेच मागे आहोत. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्राथमिकपणे आरोग्य सुविधा पुरवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. आरोग्य उपसंचालक डॉ. जयसवाल म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आरोग्य विभागात रिक्त असलेली पदे भरण्यासाठी सुद्धा पुढाकार घेण्यात येईल. चांगल्या संदर्भ देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सिकलसेल तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते फीत कापून नवीन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी नवनिर्मित इमारतीची पाहणी केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कळमकर यांनी मांडले. आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय गुज्जनवार यांनी मानले. कार्यक्रमाला धाबेपवनी परिसरताील ग्रामस्थांनी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)