दिलासादायक! गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका झाला ग्रीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 11:33 AM2020-12-09T11:33:28+5:302020-12-09T11:36:47+5:30
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही सर्वात उशिरापर्यंत कोरोनाला आपल्या हद्दीत प्रवेश करून देणारा देवरी तालुका सर्वात प्रथम ग्रीन झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही सर्वात उशिरापर्यंत कोरोनाला आपल्या हद्दीत प्रवेश करून देणारा देवरी तालुका सर्वात प्रथम ग्रीन झाला आहे. आतापर्यंत ५५६ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आलेल्या देवरी तालुका मंगळवारी (दि.८) एकही रूग्ण नसल्याची नोंद शासकीय आकडेवारीनुसार करण्यात आली आहे. यामुळे देवरी तालुक्यासाठी गुडन्यूज असतानाच आता तालुका प्रशासनाची जबाबदारी आणखीच वाढली आहे.
कोरोनामुळे देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले व २७ मार्च रोजी गोंदिया शहरातील एक तरूण बाधित आढळला होता. त्यानंतर बराच काळ गोंदिया जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली नव्हती. मात्र तिरोडा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून कोरोना बाधितांनी एंट्री केली व जिल्ह्यातील आकडेवारी झपाट्याने वाढू लागली. सर्वच तालुक्यांत बाधित निघू लागले असतानाच देवरी तालुक्यात सर्वात शेवटी कोरोनाने एंट्री केली होती. त्यानंतर मात्र आतापर्यंत देवरी तालुक्यात ५५६ बाधितांची नोंद घेण्यात आली.
नवरात्रीपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची कधी घट तर वाढ हा प्रकार सुरू आहे. असे असतानाच मात्र सर्वात शेवटी कोरोना बाधित होणारा देवरी तालुका सर्वात अगोदर ‘ग्रीन’ झाला आहे. मंगळवारी (दि.८) कोरोना बाधितांची शासकीय आकडेवारी बघितली असता देवरी तालुक्यात असलेला एकमात्र कोरोना रूग्ण बरा होऊन त्याची सुटी करण्यात आल्याने तालुक्यातील एकही रूग्ण शिल्लक नसल्याची नोंद घेण्यात आली आहे.
तालुका प्रशासनाची जबाबदारी वाढली
राष्ट्रीय महामार्गवर असलेल्या देवरी तालुक्यात सर्वात शेवटी कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते. एवढेच नव्हे तर आता हाच तालुका सर्वात प्रथम कोरोनामुक्त झाला आहे. यामुळे तालुका प्रशासनाच्या कामगिरीची प्रशंसा करणे गरजेचे आहे. मात्र आता तालुका कोरोनामुक्त झाल्याने तालुका प्रशासनाला आपला तालुका ‘ग्रीन’ ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. यात तालुवासीयांचे सहकार्य अपेक्षीत आहेच.
१० रूग्णांचा कोरोनाने घेतला बळी
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १६८ रूग्णांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये देवरी तालुक्यातील १० रूग्णांचा समावेश आहे. घरातील कुणाचाही जीव गेल्याने त्या कुटुंबावर काय परिणाम पडतो हे त्याचे त्यांनाच माहिती असते. यामुळे आता तालुकावासीयांनी अधिकच खरबदारीने वागण्याची गरज आहे. कोरोना विषयक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करून आपला तालुका ‘ग्रीन’ ठेवणे हे आता तालुकावासीयांच्या हातातच आहे.