गुड न्यूज! गणेश मंडळांना मिळणार घरगुती दराने वीज; महावितरणकडून विशेष भेट
By कपिल केकत | Published: September 1, 2023 06:49 PM2023-09-01T18:49:17+5:302023-09-01T18:49:45+5:30
अवैधरित्या वीजजोडणी करणे टाळा
गोंदिया : जेमतेम काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून, त्यादृष्टीने गणेश मंडळांची तयारी सुरू झाली आहे. यात गणेश मंडळांकडून वीज चोरीचे प्रकार घडू नयेत, यासाठी महावितरणकडून गणेश मंडळांना घरगुती दरात वीज दिली जाणार आहे. यामुळे मंडळांनी महावितरणकडे संपर्क साधून नियमानुसार वीजजोडणी घेऊन सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करावा, असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
येत्या १९ तारखेला ला़डक्या गणरायाचे आगमन होत असून, त्यासाठी गणेश मंडळांकडून तयारीला सुरूवात झाली आहे. आपल्या मंडळाचा सर्वात वेगळा देखावा व रोषणाई असावी, यासाठी सर्वांचेच प्रयत्न असतात. मात्र, असे करताना कित्येकांकडून काही पैसे वाचविण्यासाठी अवैधरित्या वीज जोडणी घेतली जाते. हा प्रकार धोकादायक असून, यातूनच कित्येकदा अपघात घडतात व अनर्थ होतो. विशेष म्हणजे, कित्येकदा हा प्रकार अंगलट येत असून, कित्येकांना आपल्या जीवाला मुकावे लागल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत.
नेमकी हीच बाब हेरून महावितरणकडून लाडक्या गणरायाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून गणेश मंडळांना घरगुती दराने वीज दिली जाणार आहे. जेणेकरून मंडळांकडून अवैधरित्या वीजजोडणी घेतली जाऊ नये व काही अप्रिय घटना घडू नये. यासाठी गणेश मंडळांनी महावितरण अभियंत्यांशी संपर्क साधावा, असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
लागणार ही कागदपत्रं
गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी घेण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज संस्था मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, वीज निरीक्षकांचे वीज संच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीज संच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयीकृत बॅंक खाते पासबुकची छायांकीत प्रत आदी कागदपत्र लागणार आहेत.
गणेश मंडळांनी अशी घ्यावी काळजी
- गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकराचे वीज अपघात होऊ नयेत, यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब वीज वाहिन्या, रोहित्र आदी यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे.
- मंडपातील वीज संच मांडणी करताना वीज सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे.
- मंडपातील वीज संच मांडणी मान्यताप्राप्त वीज कंत्राटदारांकडून करून घ्यावी.
- गणेश मंडळांनी वीज सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडतोड करू नये. आपत्कालीन परिस्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक नोंदवून ठेवावे.