गूड न्यूज: गोंदियाला मिळाला यलो अलर्ट, गुरूवारी पावसाचे पुनरागमन

By कपिल केकत | Published: August 17, 2023 07:14 PM2023-08-17T19:14:31+5:302023-08-17T19:14:41+5:30

पावसामुळे वातावरणात गारवा

Good news, Gondia gets yellow alert, rains return on Thursday | गूड न्यूज: गोंदियाला मिळाला यलो अलर्ट, गुरूवारी पावसाचे पुनरागमन

गूड न्यूज: गोंदियाला मिळाला यलो अलर्ट, गुरूवारी पावसाचे पुनरागमन

googlenewsNext

कपिल केकत, गोंदिया: मागील दहा-बारा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचेही टेन्शन वाढले आहे. मात्र, गुरूवारी (दि. १७) पावसाचे पुनरागमन झाल्याने दिलासा मिळाला. त्यातच शुक्रवारपासून (दि. १८) पुढचे चार दिवस गोंदिया जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

४ ऑगस्टपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली व ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखा अनुभव येऊ लागला होता. पावसाने दडी मारल्यामुळे सर्वसामान्यांचा चिंता वाढली असतानाच शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पाऊस नसल्यामुळे उकाडा प्रचंड वाढला होता. सर्वांनाच पावसाची गरज भासत होती. अशात गुरूवारी (दि. १७) पावसाचे पुनरागमन झाले व दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.

विशेष म्हणजे, हवामान विभागाने शुक्रवारपासून येत्या सोमवारपर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ दिला आहे. या काळात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात आतापर्यंत ६९५.३ मिमी पाऊस बरसला आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये सरासरी ३८२ मिमी पावसाची तूट आहे. आता हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे मुसळधार पाऊस झाल्यास ही तूट भरून निघू शकते.

पिकांना मिळणार जीवदान

मागील सुमारे पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतजमिनीला तडा गेला आहे. त्यात प्रखर ऊन तापत असल्यामुळे पिके सुकण्याच्या स्थितीत आली आहेत. असे झाल्यास मात्र शेतकरी पार मोडून जाणार आहे. मात्र, गुरूवारच्या पावसाने त्यांना दिलासा मिळाला. शुक्रवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली तर मात्र पिकांना जीवदान मिळणार व शेतकरी हसणार.

Web Title: Good news, Gondia gets yellow alert, rains return on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस