गुड न्यूज, पॅसेजर, लोकल लवकरच रुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:27 AM2021-02-12T04:27:10+5:302021-02-12T04:27:10+5:30
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील ११ महिन्यांपासून रेल्वेसेवा अजूनही पूर्ववत ट्रॅकवर आलेली नाही. काही विशेष गाड्या वगळल्या तर पॅसेजर ...
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील ११ महिन्यांपासून रेल्वेसेवा अजूनही पूर्ववत ट्रॅकवर आलेली नाही. काही विशेष गाड्या वगळल्या तर पॅसेजर आणि लोकल गाड्या बंदच असल्याने प्रवाशांना याचा आर्थिक भूर्दंड बसत असून त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने रेल्वे विभागाने सर्वाधिक प्रवासीसंख्या असलेल्या मार्गावरील पॅसेजर आणि लोकल गाड्यांची यादी मागविली आहे. त्यामुळे पॅसेजर आणि लोकल गाड्या दहा ते पंधरा दिवसांत ट्रॅकवर येण्याची शक्यता आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानक प्रमुख असून या रेल्वेस्थानकावरुन दररोज दीडशे प्रवासी गाड्या धावतात. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील ११ महिन्यांपासून पॅसेजर आणि लोकल रेल्वे गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या नाहीत. त्यामुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांची फारच अडचण होत आहे. गोंदिया- बल्हारशा, गोंदिया-बालाघाट, गोंदिया-कटंगी, गोंदिया-रायपूर, गोंदिया-इतवारी, गोंदिया-डोंगरगड या पॅसेजर गाड्या बंद असल्याने प्रवाशांची फारच होरपळ होत आहे. या रेल्वेगाड्या जिल्ह्यातील भाजीविक्रेते, दूधविक्रेते आणि रोजगारासाठी गोंदिया येथे दररोज येणाऱ्यांसाठी एकप्रकारची जीवनदायीनच आहे. मात्र, ११ महिन्यांपासून या गाड्या बंद असल्याने प्रवाशांना एसटी बस अथवा खासगी प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. मात्र, तिकीट दर अधिक असल्याने त्याचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. गोंदिया ते चंदपूर या प्रवासासाठी प्रवाशांना पॅसेजरने केवळ ३५ रुपये लागत होते. मात्र, याच प्रवासाठी एसटी ३०० रुपये मोजावे लागत आहे. पाच ते दहा पट अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना कधी एकदाची पॅसेजर आणि लोकल गाडी रुळावर येते. याकडे चातकाप्रमाणे लक्ष लागले आहे. कोरोनानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने रेल्वे विभागाने सुध्दा या गाड्या सुरु करण्यासाठी आता पाऊले उचलली आहे. रेल्वे बोर्डाने नुकतीच गोंदिया रेल्वेस्थानकावरुन सर्वाधिक प्रवासीसंख्या असलेल्या पॅसेजर आणि लोकल गाड्यांची यादी मागविली आहे. रेल्वे विभागाने या प्रमुख गाड्यांची यादी पाठविली असून येत्या दहा ते पंधरा दिवसांत या गाड्या रुळावर येण्याची शक्यता रेल्वे विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
........
भुसावळ पॅसेजर गोंदियापर्यंत चालवा
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानकावरुन दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३० हजारांवर आहे. त्यामुळे भुसावळ पॅसेजर, अमरावती-जबलपूर या रेल्वेगाड्या गोंदियामार्गे चालविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. या गाड्या सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.
........
इतर गाड्यांची संख्या वाढणार
गोंदिया रेल्वेस्थानकावरुन लॉकडाऊनपूर्वी आठवड्यातृून दररोज दीडशेवर गाड्या धावत होत्या. मात्र, आता केवळ ३० ते ३५ गाड्या धावत आहे. मात्र, या गाड्यांची संख्यासुध्दा वाढविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.