गूडन्यूज ! तिरोडा तालुका झाला ग्रीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:54 AM2021-02-21T04:54:18+5:302021-02-21T04:54:18+5:30
गोंदिया : राज्यात फोफावत असलेल्या कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात जिल्ह्यात यश आले आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा ...
गोंदिया : राज्यात फोफावत असलेल्या कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात जिल्ह्यात यश आले आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट असलेला तिरोडा तालुका आता ग्रीन झाला आहे. मागील २ दिवसांपासून तिरोडा तालुक्यात नवीन बाधित निघाले नसून क्रियाशील रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता तेथे एकही क्रियाशील रुग्ण नाही. तर जिल्ह्यात आता तिरोडासह देवरी व सडक-अर्जुनी तालुका ग्रीन झाला आहे.
राज्यात कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले असून उद्रेक वाढू लागला आहे. परिणामी आता राज्य शासनाला पुन्हा काही निर्बंध लावावे लागले आहे. विशेष म्हणजे, काही जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर होताना दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाला घेऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाच मात्र जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले असून दररोजच्या बाधितांची संख्या बघून हे दिसून येते. जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण सध्या निघत असल्याने तेवढा दिलासा आहे. त्यातच बाधितांची संख्या कमी असल्याने आता क्रियाशील रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात दुसऱ्या क्रमाकांचा हॉटस्पॉट असलेला तिरोडा तालुका आता ग्रीन झाला आहे. जिल्ह्यात सुरूवातीपासूनच गोंदिया तालुका पहिल्या क्रमांकाचा हॉटस्पॉट असून तिरोडा तालुका दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट आहे. गोंदिया तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक ७९२२ बाधितांची नोंद घेण्यात आली असून त्यानंतर तिरोडा तालुक्यात १४१६ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. मात्र मागील दोन दिवसापासून तिरोडा तालुक्यातील संपूर्ण क्रियाशील रुग्ण बरे झाले असल्याने तिरोडा तालुका ग्रीन झाला आहे. याशिवाय, देवरी व सडक-अर्जुनी तालुकाही ग्रीन झाला आहे. म्हणजेच, सध्या जिल्ह्यातील तीन तालुके ग्रीन झाले असून ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.
-----------------------------
आवश्यक ती खबरदारी गरजेची
जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेला तिरोडा तालुका ग्रीन झाला ही नक्कीच जिल्हावासीयांसाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र यापूर्वीही काही तालुके ग्रीन झाल्यानंतर तेथे पुन्हा बाधित रुग्ण आढळून आल्याने आता ते परत कोरोनाग्रस्त तालुक्यांच्या यादीत आले आहेत. म्हणजेच, तालुका ग्रीन झाला म्हणून नागरिकांनी मोकळा श्वास घेण्याची गरज नसून आपला तालुका पुढेही कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आता आणखीच खबरदारीने वागण्याची गरज आहे.
-------------------------
तिरोडा तालुक्यातील २४ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत १८४ रुग्णांचा जीव घेतला आहे. यात गोंदिया तालुका प्रथम क्रमांकावर हॉटस्पॉट होता व आजही असून येथील तब्बल १०२ रुग्णांचा जीव गेला आहे तर दुसऱ्या क्रमांकावरील हॉटस्पॉट असलेल्या तिरोडा तालुक्यातील २४ रूग्णांचा जीव गेला आहे. या दोन तालुक्यांची स्थिती अत्यंत गंभीर होती. आता सुदैवाने तिरोडा तालुका ग्रीन झाला असल्याने त्याला कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.