गूड न्यूज ! तालुक्यांतील क्रियाशील रूग्ण संख्या ५ च्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:07 AM2021-07-13T04:07:09+5:302021-07-13T04:07:09+5:30
गोंदिया : जिल्हा प्रशासनाने केलेली उपाययोजना तसेच जिल्हावासीयांचे मिळत असलेले सहकार्य यामुळे जिल्ह्यातून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा काढता पाय दिसत ...
गोंदिया : जिल्हा प्रशासनाने केलेली उपाययोजना तसेच जिल्हावासीयांचे मिळत असलेले सहकार्य यामुळे जिल्ह्यातून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा काढता पाय दिसत आहे. जिल्ह्यात आता जेमतेम २० क्रियाशील रूग्ण असून दिलासादायक बाब म्हणजे, प्रत्येकच तालुक्यात आता ५ च्या आतच क्रियाशील रूग्ण आहेत. अशीच नियंत्रीत स्थिती राहिल्यास येत्या आठवडाभरात जिल्हा कोरोनामुक्त होणार यात शंका वाटत नाही.
कोरोनाची पहिली लाट आली त्या तुलनेत दुसऱ्या लाटेने अधिक कहर केला असून क्रियाशील रूग्णांच्या संख्येसोबतच मृतांची संख्याही या काळात दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. आजघडीला जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४११६७ झाली असून यात आतापर्यंत ७०० हून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. यातून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर व तेव्हाच्या भयावह स्थितीचा अंदाज लावता येतो. आजही कोरोना रूग्ण निघत असून त्यांची संख्या नियंत्रणात असल्यामुळे मात्र जिल्ह्यातून दुसरी लाट ओसरल्याचे दिसत आहे. परिणामी जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आले आहे. जिल्हावासीयांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे, आजघडीला जिल्ह्यात एकूण २० क्रियाशील रूग्ण असून यातील १२ रूग्ण घरीच अलगीकरणात आहेत. त्यातही तालुक्यांतील रूग्ण संख्या आता ५ च्या आत आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट असलेला तिरोडा तालुका मागील ११ दिवसांपासून कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हावासीयांच्या संयमाचे हे फलीत म्हणता येणार असून अशीच साथ दिल्यास यापुढे कोरोनाला डोकेवर काढता येणार नाही.
-------------------------------------
सालेकसा व आमगाव सरसावले
जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा हॉटस्पॉट असलेला गोंदिया तालुका आता नियंत्रणात असून लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या तयारीत आहे. मात्र सालेकसा व आमगाव तालुक्यात मध्यंतरी रूग्ण वाढताना दिसून आले. यामुळेच आता तिरोडा तालुकाही कोरोनामुक्त असून अन्य तालुक्यांत जेथे मोजकेच रूग्ण आहेत. तेथेच सालेकसा तालुक्यात ५ तर आमगाव तालुक्यात ४ रूग्ण आहेत. यामुळे आता या तालुकावासीयांनीही संयम पाळणे गरजेचे दिसून येते.
-----------------------------------
क्रियाशील रूग्णांचा तालुकानिहाय तक्ता
तालुका क्रियाशील रूग्ण
गोंदिया ०१
तिरोडा ००
गोरेगाव ०२
आमगाव ०४
सालेकसा ०५
देवरी ०१
सडक-अर्जुनी ०३
अर्जुनी-मोरगाव ०२
इतर राज्य-जिल्हा ०२
एकूण २०