तीन गावांना ‘गुडमार्निंग भेट’
By admin | Published: January 23, 2017 12:28 AM2017-01-23T00:28:00+5:302017-01-23T00:28:00+5:30
जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आय.एस.ओ. मानांकन
स्वच्छता तपासणी : हागणदारीमुक्तीकडे वाटचालीचे समाधान
देवरी : जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आय.एस.ओ. मानांकन ग्रामपंचायत जेठभावडा अंतर्गत हागणदारी मुक्त स्वच्छता तपासणी पथकाने बुधवारी (दि.१८) पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास जेठभावडा, सिंदीबिरी व मसुरभावडा या गावी ‘गुडमार्निंग भेट’ दिली.
या हागणदारीमुक्त स्वच्छता तपासणी पथकात गोंदिया जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख व देवरी पं.स.चे गटविकास अधिकारी संतोष पांडे यांच्यासह जेठभावडाचे सरपंच डॉ. जितेंद्र रहांगडाले, उपसरपंच भोजराज गावळकर, सचिव एस.डब्ल्यू. बन्सोड यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे गुड मार्निंग तपासणी पथकाला या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जेठभावडा, सिंदीबिरी व मसुरभावडा या गावात प्रत्यक्ष पाहणीत एकही जण उघड्यावर शौचास जाताना किंवा बसताना आढळला नाही. या संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये हागणदारीमुक्त स्वच्छता अभियान सार्थक झाल्याने या पथकाने ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावकऱ्यांचे आभार मानले. तसेच समाधान व आनंद व्यक्त केला.
त्याचप्रमाणे या पथकाने जेठभावडा ग्रामपंचायत कार्यालयालासुद्धा भेट देऊन पाहणी केली. यात कार्यालयात लावलेले सीसीटीव्ही प्रोजेक्टर व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग या ग्रामपंचायतमधील नागरिकांसाठी योग्यरित्या होत असल्याने समाधान व्यक्त केले.
हागणदारीमुक्त स्वच्छता तपासणी पथकाने ग्रामपंचायतमधील जेठभावडा, सिंदीबिरी व मसुरभावडा या गावांना भेटी देऊन पाहणी केल्याबद्दल येथील लोकांनी या पथकाचे आभार मानले.