धारदार शस्त्रासह ४३ हजारांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:31 AM2021-08-26T04:31:16+5:302021-08-26T04:31:16+5:30
गोंदिया : रेल्वेगाड्यांच्या जनरल डब्यातील प्रवाशांचे मोबाइल पळविणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गोंदिया रेल्वे पोलिसांनी २५ ऑगस्टच्या सकाळी ५.३० वाजता ...
गोंदिया : रेल्वेगाड्यांच्या जनरल डब्यातील प्रवाशांचे मोबाइल पळविणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गोंदिया रेल्वे पोलिसांनी २५ ऑगस्टच्या सकाळी ५.३० वाजता गोंदिया रेल्वेस्थानकावर पकडले. त्या आरोपीकडून धारदार शस्त्र व सहा मोबाइल जप्त करण्यात आले. हर्ष राजेश बन्सोड (२२), रा. भांकरनगर वॉर्ड नं. १३, जि. दुर्ग (छत्तीसगड), असे आरोपीचे नाव आहे.
२४ ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वरी डिलक्स एक्स्प्रेस गाडी क्रमांक ०२१०२ मध्ये राखीनिमित्त शिशुपाल भरतलाल बर्वे (२३), रा. भांकरपूर, गल्ली क्रमांक १, राजनांदगाव यांचा गोंदिया रेल्वेस्थानकावरून मोबाइल पळवला होता. गर्दीचा फायदा घेऊन त्याने मोबाइल चोरला होता. या प्रकरणाची तक्रार गोंदिया रेल्वे पोलिसांनी दाखल केल्यावर गाडी येताना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी २५ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता गीतांजली एकस्प्रेस गोंदियाच्या फलाट क्रमांक ३ वर आली असता जनरल डब्यातून गर्दीचा फायदा घेऊन आरोपीने मोबाइल चोरून गाडी थांबताच फलाटावर न उतरता विरुद्ध दिशेने रेल्वे ट्रॅकवर उतरून पळत असताना पोलिसांनी घेराबंदी केली आणि त्याला पकडले. त्याची तपासणी केल्यावर त्याच्याजवळ ४३ हजार २०० रुपये किमतीचे सहा मोबाइल व एक धारदार शस्त्र आढळले. मुद्देमालासह त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई रेल्वेचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.व्ही. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया रेल्वे ठाण्याच्या प्रभारी एस.व्ही. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस नायक ओमप्रकाश सेलोटे, नंदकिशोर नारनवरे, अखिलेश रॉय, रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख नंद बहादूर, उपनिरीक्षक विनेक मेश्राम, नासीर खान, अनिल पाटील, दुबे, कटरे यांनी केली आहे.
...................
आरोपीवर यापूर्वी आठ गुन्हे दाखल
रेल्वे पोलिसांनी अटक केलेला आरोपी हर्ष राजेश बन्सोड (२२), रा. भांकरनगर, वॉर्ड नं. १३, जि. दुर्ग (छत्तीसगड) याच्यावर रेल्वेमध्ये चोरी केल्याच्या विविध ठिकाणी आठ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला शिक्षाही सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.