७० वर्षीय गोपिकाबाईची घरकुलासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 09:27 PM2018-08-13T21:27:26+5:302018-08-13T21:28:11+5:30
केंद्र व राज्य सरकारने २०२४ पर्यंत सर्वांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न अजूनही बरेच दूरच आहे. हक्काचे घरकुल मिळावे यासाठी मागील आठ वर्षांपासून ७० वर्षीय वृध्द महिलेची शासन दरबारी फरफट सुरू आहे. मात्र अद्यापही प्रशासनाला पाझर फुटलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : केंद्र व राज्य सरकारने २०२४ पर्यंत सर्वांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न अजूनही बरेच दूरच आहे. हक्काचे घरकुल मिळावे यासाठी मागील आठ वर्षांपासून ७० वर्षीय वृध्द महिलेची शासन दरबारी फरफट सुरू आहे. मात्र अद्यापही प्रशासनाला पाझर फुटलेला नाही.
गोपीकाबाई उदारा बनकर (७०) रा. कोदामेडी असे त्या वृध्द महिलेचे नाव आहे. गोपिकाबाईला तीन मुले आहेत. ती आपल्या मुलांसह कोदामेडी येथे राहते. २०१४ मध्ये गोपिकाबाईच्या पतीचे निधन झाले. हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गोपिकाबाई मागील आठ वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र अद्यापही घरकुल मंजुर झाले नसल्याने ती आपली मुले व नातावंडासह झोपडीत राहत होती.
मात्र तिच्या झोपडीला सुध्दा निसर्गाचा फटका बसला. पावसामुळे झोपडी कोसळल्याने गोपिकाबाईच्या कुटुंबीयांवर उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. मात्र यानंतरही प्रशासनाला जाग आली नसून ७० वर्षीय वृध्द गोपीकाबाई घरकुलासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहे. मात्र दगडाच्या प्रशासनाला अद्यापही पाझर फुटलेला नाही. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक गरजू व्यक्तीला घरकुलाचा लाभ दिला जातो.
गोपिकाबाई यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेचा यादीमध्ये नाव समाविष्ट आहे. मात्र प्रत्यक्षात अंत्यत गरजू लाभार्थ्यांच्या यादीत त्यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांना घरकुल मिळण्यास विलंब होत असल्याची माहिती ग्रामपंचायतच्या कर्मचाºयांनी दिली. केवळ प्रशासकीय दप्तर दिंरगाईमुळे गोपिकाबाईला घरकुल मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ खरोखरच गोरगरीब लाभार्थ्यांना मिळत आहे का यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
दुसऱ्याच्या घराचा आसरा
पावसामुळे गोपीकाबाईचे राहते घर कोसळल्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या घराचा आसरा घेवून राहावे लागत आहे. मात्र याकडे अद्यापही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
गोपिकाबाई यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत ५३ व्या क्रमांकावर होते. नवीन यादीत ९ व्या क्रमांकावर असून ग्रामसेवकांकडून गोपिकाबाईला तत्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. असे पत्र दिले आहे.
-निशांत राऊत, ग्रा.पं.सदस्य, कोदामेडी