गोरेगावचे ग्रामीण रुग्णालय ‘हाऊसफुल्ल’
By admin | Published: September 9, 2014 12:28 AM2014-09-09T00:28:41+5:302014-09-09T00:28:41+5:30
गोरेगाव तालुक्यात तापाने थैमान घातले असून स्थानिक ग्रामीण रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे अवघ्या २० खाटांच्या या रुग्णालयात रुग्णांना जागा मिळेल तिथे आसरा घ्यावा लागत आहे.
दिलीप चव्हाण - गोरेगाव
गोरेगाव तालुक्यात तापाने थैमान घातले असून स्थानिक ग्रामीण रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे अवघ्या २० खाटांच्या या रुग्णालयात रुग्णांना जागा मिळेल तिथे आसरा घ्यावा लागत आहे.
ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे जानाटोला, घोटी, भंडगा, मुंडीपार, पिंडकेपार, गराडा, आसलपाणी, झांजीया, कटंगी, हलबीटोला, हिरडामाली, बोटे, म्हसगाव, सलंगटोला, बबई, गिधाडी या गावांतील रुग्ण येतात. सध्या वातावरण बदलामुळे तापाचे प्रमाण वाढले आहे. नागरिक विविध आजाराने ग्रस्त आहेत. यात ९० टक्के रुग्ण तापाने ग्रस्त आहेत. आज ग्रामीण रुग्णालयात ४०० ते ५०० रुग्ण उपचारासाठी उपस्थित होते. अनेकांना सर्दी, खोकला आणि ताप या तीन रोगांनी मोठ्या प्रमाणात पछाडल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.के. पटले यांनी सांगितले. ४०० ते ५०० रुग्णांना सेवा देण्यासाठी डॉ. सचिन पाटील, डॉ. पी.के. पटले व त्यांची यंत्रणा कामाला लागली आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने साफसफाई न केल्यामुळे डासांची संख्या वाढली. सोबतच दूषित पाणी पुरवठा, वातावरणात उष्णतेचे वाढलेले प्रमाण या सर्व बाबींमुळे अनेक गावे आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयात २० खाटांची व्यवस्था आहे. मात्र सद्या २० बेड रुग्णसंख्या वाढल्यामुळे खाटा कमी पडत आहेत. सध्या गोरेगाव रुग्णालय हाऊसफूल्ल असल्यामुळे रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था कुठे करावी, रुग्णांना सेवा कशी द्यावी हे गंभीर प्रश्न रुग्णालय प्रशासनाला भेडसावत आहे.
वाढलेल्या रुग्णांमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयात येणारी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील रुग्णालयात २० खाटांवर २० रुग्णांना सेवा देणे सुरू आहे. मात्र नव्याने येणाऱ्या रुग्णांना खाटा कुठून द्यायच्या, असा प्रश्न आरोग्य प्रशासनाला पडला आहे.
रक्त तपासणीसाठी विशेष सोय आहे. सोमवारी ७० संशयीत मलेरियाच्या रुग्णांचे रक्त तपासण्यात आले. इतर ५० रुग्णांचे रक्त तपासण्यात आले. सदर रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कुठेही कमी नाही.
सुसज्ज इमारतीत कारभार चालतो. रुग्णांच्या वाढलेल्या गर्दीमुळे तीन वैद्यकीय अधिकारी सेवेत कार्यरत आहेत.