‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत गोरेगाव अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 09:22 PM2018-04-09T21:22:49+5:302018-04-09T21:22:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्वाकांक्षी योजनेत यावर्षी गोरेगाव तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. सन २०१७-१८ या वर्षात कृषी विभागामार्फत गोरेगाव तालुक्यात तब्बल १०० शेततळे पूर्ण करण्यात आले आहेत.
तालुक्यातील मुख्य खरीप धान पिकास संरक्षित सिंचन, रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकाची लागवड, पावसाचे पाणी शिवारात अडविणे, भूगर्भाच्या पाण्याचा पातळीत वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी सरंक्षित सिंचन उपलब्ध करणे या उद्देशपूर्तीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती क रण्यात आली. तसेच ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत २५९ शेतकऱ्यांचे अर्ज आॅनलाईन भरुन घेतले. त्यापैकी पात्र शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश देऊन विविध आकारमानातील शेततळ्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
बांधकाम पूर्ण झालेल्या शेततळ्याच्या आकारमानाप्रमाणे ५०,००० रु. अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. मागील वर्षी पाथरी या गावातील झनकलाल चौरागडे यांनी २५-३०-३ मिटर आकाराचे शेततळे बांधून पूर्ण केले. याआधी चौरागडे यांना सरंक्षित सिंचन नसल्याने खरीप हंगामात पूर्णपणे पावसावर अवलंबून धान शेती करावी लागत होती. तसेच अनियमित पाऊस असल्याने दुष्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. तालुक्यात रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे रब्बी हंगामात बरेचशे क्षेत्र पडीक राहत होते. त्या अनुषंगाने त्यांनी शेततळे बांधण्याचा संकल्प करुन पूर्ण केला. आजघडीला तालुक्यातील बऱ्याच शेततळ्यात मुबलक प्रमाणावर पाणी साठून आहे. तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात शेतकरी शेततळी तयार करण्यात पुढे असून योग्य मार्गदर्शनामुळे भविष्यात शेतकऱ्यांना शेततळ्यांचा योग्य फायदा होणार.
गोरेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थीतीची समस्या लक्षात घेता तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अचूक नियोजन केले. जलसंधारण व खरिपातील मुख्य पिकास बसणारा ताण यामुळे भात पिकाची उत्पादकता आता कमी होत होती. ती यापुढे शेततळे उपचारामुळे दिसून येणार नाही.
- ए.एम.इंगळे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया
सन २०१८-१९ या वर्षात उर्वरीत इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावातील कृषी सहाय्यक व तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा.
-मंगेश वावधने,
तालुका कृषी अधिकारी, गोरेगाव.