गोरेगावातील पाणीपुरवठा योजनेची वाट मोकळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:35 PM2019-01-02T21:35:13+5:302019-01-02T21:36:03+5:30
गोरेगाव शहराकरिता नव्या पाणी पुरवठा योजनेची वाट मोकळी झाल्याची दिसत आहे. नगर पंचायतच्या स्थापने नंतरच या दिशेने प्रयत्न केले जात होते. मात्र आता नगर पंचायतकडून या संदर्भात एक पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरेगाव शहराकरिता नव्या पाणी पुरवठा योजनेची वाट मोकळी झाल्याची दिसत आहे. नगर पंचायतच्या स्थापने नंतरच या दिशेने प्रयत्न केले जात होते. मात्र आता नगर पंचायतकडून या संदर्भात एक पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला देण्यात आले आहे.
गोरेगावला लागून अगोदरचीच एक पाणी पुरवठा योजना सुरू आहे. या योजनेतून गोरेगाव त्याला लागून असलेल्या चार गावांना संयुक्तरित्या पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र ही जुनी व जर्जर झाली आहे. यामुळे नव्या योजनेसाठी कित्येक वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. त्यात गोरेगावला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रयत्नांना अधीक जोर दिला जात होता.
यासाठी नगर पंचायतकडून प्रस्ताव मंजूर करून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला देणे बंधनकारक होते. त्यानुसार गोरेगाव नगर पंचायतने नुकतेच दोन-तीन दिवसांपूर्वी एक पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला दिले आहे.
त्यानंतर आता एक-दोन दिवसांत महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून एक पत्र तयार करून गोरेगाव नगर पंचायतला दिले जाणार आहे. या पत्रात नगर पंचायतकडून एक रक्कम टाकण्याचे आवाहन केले जाणार आहे. ही रक्कम टाकल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांकडन सर्वेक्षणाचे काम सुरू केले जाणार आहे. हे सर्वेक्षण झाल्यानंतर कामाचे एस्टीमेट तयार करून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे एक प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.
प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतरच योजनेच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. आता नवीन पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला कधी मंजुरी मिळते यावर सर्व काही अवलंबून आहे. मात्र योजनेची वाट मोकळी झाल्याने योजना येणार हे स्पष्ट झाले आहे.
काय आहे नवीन पाणीपुरवठा योजनेत
जुन्या व सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेत तीन टाक्या बनलेल्या आहेत. या तीन टाक्यांना नवीन योजनेतही कामी आणले जाईल. याशिवाय एक नवी टाकी तयार केली जाईल. नव्या योजनेत गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत येणाºया नवीन वसाहत ज्या जुन्या योजनेत समाविष्ट नाहीत त्यांना जोडले जाईल. याशिवाय पुर्ण पाईप लाईन नव्याने टाकली जाणार. जल शुद्धीकरण केंद्र क्वचीतच स्थापित केले जाईल. जुनी योजना चार गावांसाठी होती, मात्र नवीन योजना फक्त नगर पंचायत अंतर्गत येणाºया गावांसाठी राहणार आहे.
नुकतेच पत्र मिळाले आहे. नवीन पाणी पुरवठा योजना तयार केली जाणार असून तसे प्रयत्न सुरू आहेत. गोरेगाववासीयांनी शुद्ध पाणी पुरवठा व्हावा हेच आमचे प्रयत्न आहे.
-रोशनी धमगाये , अभियंता, मजिप्रा