लॉकडाऊनच्या कालावधीत मिळाला हातांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:35+5:30
मोहफुले, तेंदूपाने संकलन करुन विक्री करणे हे जंगलव्याप्त भागातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या अनेक ग्रामसभा तेंदूपाने संकलन करुन सन २०१३ पासून तर काही गावे २०१७ पासून स्वत: संकलन व व्यवस्थापन करुन विकतात.
गजानन शिवणकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरपूरबांध : ग्रुप ऑफ ग्रामसभा (देवरी) यांनी वनहक्क कायदा २००६ नुसार गठीत ग्रामसंघाच्या महासंघातील आदवासी व इतर पारंपारीक वननिवासी (वनहक्क धारक) समुदायाने लॉकडाऊनच्या कालावधीत तेंदूपत्ता संकलन व विक्री करुन ११ दिवसांत अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले. शिवाय, यामुळे शेकडो हातांना रोजगार सुद्धा मिळाला आहे.
मोहफुले, तेंदूपाने संकलन करुन विक्री करणे हे जंगलव्याप्त भागातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या अनेक ग्रामसभा तेंदूपाने संकलन करुन सन २०१३ पासून तर काही गावे २०१७ पासून स्वत: संकलन व व्यवस्थापन करुन विकतात. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने हे कार्य प्रभावित होऊन अनेक कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. याचा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती. सदर गावे जंगलालगत असल्याने शेती इतकेच किंबहुना अधिक महत्त्व या वनहक्क धारकाला वनोपज गोळा करुन विकण्यास आहे. तेंदूपत्ता संग्रहनाचे मुख्य ठिकाण देवरी आहे. या महासंघात समाविष्ट एकूण महसुली गावे २८ व टोले, पाडे मिळून ४२ ग्रामसभेतील ५०६९ कुटुंब काम करतात.
यामुळे प्रती व्यक्ती १५-२० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. पण यंदा कोरोनामुळे तेंदूपत्ता संकलनाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती. शासनाने तेंदूपत्ता संकलन करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल व इतर उपाययोजना करण्याच्या अटीवर तेंदूपत्ता संकलनास मंजुरी दिली. विदर्भ उपजिवीका मंचचे पदाधिकारी दिलीप गोडे, तांत्रिक अधिकारी वासुदेव कुलमेथे, ललीत भांडारकर तसेच ग्रामसभेचे पदाधिकारी मोतीराम सयाम, नारायण सलामे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. पोलीस अधीक्षकांनी ग्रामसभेत संचारबंदीत नियम व अटीशर्तीच्या आधारे संकलन केंद्र सुरु करण्यात परवानगी दिली. याचा लाभ जिल्ह्यातील अनेक गरीब व गरजू आदिवासी, गैरआदिवासी व भूमिहिन नागरिकांना झाला. यामुळे वनहक्क प्राप्त गावच्या अनेक ग्रामसभा व त्यांचे महासंघांना तेंदूपाने गोळा करुन विक्री करणे शक्य झाले.
त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ग्रुप ऑफ ग्रामसभा महासंघात समाविष्ट असलेल्या एकूण ४२ गावांतील एकूण ४८१३४३० तेंदूपुडे वनहक्कधारकांनी प्राप्त अधिकार राबवित संकलीत करुन ५२०९ रुपये प्र.मा.गोणीप्रमाणे विक्री केली. ज्यात २४४० पुरुष व ५९० महिला असे एकूण ३२३० कुटुंबांना सरासरी १५ ते २० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त होण्यास मदत झाली. यातून एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. अशाप्रकारे तेंदूपत्ता संकलनाच्या प्राप्त निधीतून कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता ‘आमचा गाव, आमचा विकास’ या उद्दिष्टाने अनेक गावे विकासात्मक सामूहिक व सामाजिक कार्य ग्रामसभेत सुरु आहेत. विशेष म्हणजे, या भागातील नागरिकांना मालकी हक्क प्राप्त झाल्यामुळे लोक स्वेच्छेने वनांचे संरक्षण करुन तेंदू झाडांच्या बुथ कटाईवर ग्रामसभेत प्रतिबंध लावण्यात आले आहे.
यामुळे वृक्षांचे संवर्धन करण्यास मदत होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेकरीता गोडे व त्यांचे सहकारी विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर तसेच ग्रुप ऑफ ग्रामसभेचे पदाधिकारी मोतीराम सयाम, नारायम सलामे, तेजराम मडावी यांनी सहकार्य केले.
शेती करण्यास झाली मदत
तेंदूपत्ता संकलनातून प्राप्त उत्पन्नातून ग्रामीण भागातील नागरिक खरीप हंगामात शेती करतात. या उत्पन्नातून शेतीच्या मशागतीची कामे, खते, बियाणे, मजुरीचा खर्च देण्यास त्यांना मदत होते. तर काही जण तलाव ठेक्याने घेवून त्यात मासेमारी करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी तेंदूपत्ता संकलन करणे महत्त्वपूर्ण रोजगार आहे.