शासकीय दुचाकींनी करणार डॉट्सच्या उपचाराचे निरीक्षण
By admin | Published: June 11, 2016 02:07 AM2016-06-11T02:07:09+5:302016-06-11T02:07:09+5:30
जिल्ह्यातील क्षयरूग्णांचे निदान, निरीक्षण व उपचार करण्यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत
रूग्ण शोध मोहीम : क्षय कर्मचाऱ्यांना दुचाकींचे वितरण
गोंदिया : जिल्ह्यातील क्षयरूग्णांचे निदान, निरीक्षण व उपचार करण्यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्रांतर्गत कार्यरत जिल्हाभरातील क्षय कर्मचाऱ्यांना शासकीय दुचाकी वाहनांचे वितरण सोमवार (दि.६) जिल्हा परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले. या वेळी एकूण १४ उपलब्ध झालेल्यांपैकी १३ वाहनांचे वाटप करण्यात आले. या वाहनांद्वारे क्षय कर्मचारी जिल्हाभरात क्षयरूग्णांचा शोध व डॉट्स उपचाराचे निरीक्षण करतील.
सन १९६२ पासून देशात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राज्यात सन १९९८-९९ पासून टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्य क्षयरोग नियंत्रण सोसायटी व जिल्हा क्षयरोग सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट कमीत कमी ९० टक्के नवीन थुंकी दूषित क्षयरूग्णांना बरे करणे व हा दर कायम राखणे तसेच अपेक्षित क्षयरूग्णांपैकी किमान ९० टक्के रूग्ण शोधणे व हा दर कायम राखणे, असे आहे.
जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या तालुका क्षयरोग पथके व जिल्हा क्षयरोग पथके यात कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना आरएनटीसीपी कार्यक्रमांतर्गत जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मान्यताप्राप्त सूक्ष्मदर्शिका केंद्रे, उपकेंद्रे, डॉट्स सेंटर, क्षयरूग्णांना भेटी आदी शासकीय कामांसाठी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण १४ शासकीय दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आले होते.
या आरएनटीसीपी शासकीय दुचाकी वाहनांचे पूजन करून जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.पी. गहलोत यांच्या हस्ते सदर वाहने वाटप करण्यात आले.
या वेळी जिल्हा क्षयरोग केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ.डी.एस. भूमकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक साकेत मोटघरे, खत्री, तोमर, बी.यू. बिसेन, श्रीरामे, अरविंद गजभिये, विलास राठोड, पंकज लुतडे, डी.बी. चौधरी, ए.एन. लोणारे, एस.व्ही. देव्हारी, धनेंद्र कटरे, निरज अग्रवाल, कांबळे, अशोक मुडपीलवार, कापसे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)