गोंदियात सुरू होणार शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 09:44 PM2018-07-15T21:44:18+5:302018-07-15T21:46:43+5:30
शासकीय मेडीकल, पॉलीटेक्नीक व नर्सिंग कॉलेजची स्थापना करविल्यानंतर आता आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासकीय इंजिनीयरींग ्रकॉलेजसाठी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून त्यांना निवेदन दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासकीय मेडीकल, पॉलीटेक्नीक व नर्सिंग कॉलेजची स्थापना करविल्यानंतर आता आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासकीय इंजिनीयरींग ्रकॉलेजसाठी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून त्यांना निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी यावर मंजुरी देत या संदर्भात आवश्यक अहवाल व प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश तंत्र शिक्षण विभागाला दिले आहे.
इंजिनीयरींग कॉलेजच्या विषयाला घेऊन आमदार अग्रवाल यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत आमदार अग्रवाल यांनी, जिल्ह्यातील खासगी इंजिनीयरींग कॉलेज तोट्यात असल्यामुळे संचालकांनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगीतले. तसेच जिल्ह्यात १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. सोबतच कित्येक खासगी व शासकीय पॉलीटेक्नीक व आयटीआयमधील शेकडो विद्यार्थी पुढे इंजिनीयरींगमध्ये प्रवेश घेण्यास इच्छूक असतात. मात्र येथील एकमात्र इंजिनीयरींग कॉलेज बंद झाल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या असून भविष्यावर प्रश्नचिन्ह लागले असून त्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगीतले.
शिवाय गोंदिया जिल्हा गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांना लागलेला असून आजघडीला या तिन्ही जिल्ह्यांत एकही शासकीय इंजिनीयरींग कॉलेज नाही. अशात गोंदियात शासकीय इंजिनीयरींग कॉलेज सुरू झाल्यास त्याचा पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांना नक्कीच लाभ मिळणार असल्याचेही आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना चर्चेत सांगीतले. तसेच आपल्या मागणीला घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावर मुख्यमंत्र्यांनी आपली मंजुरी दर्शवित यासाठी आवश्यक तसा अहवाल व प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश तंत्र शिक्षण विभागाला दिले असल्याचे आमदार अग्रवाल यांनी कळविले.
टी.बी. हॉस्पिटलची जागा सूचविली
जिल्ह्यात शासकीय इंजिनीयरींग कॉलेजची आवश्यकता मुख्यमंत्र्यांना समजावून सांगीतल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी कॉलेजसाठी शहरातील टी.बी.हॉस्पीटलची जागा सुचविली. सुमारे १७-१८ एकर जागा सध्या अनुपयोगी पडली असून इंजिनीयरींग कॉलेजसाठी एक आदर्श स्थान होऊ शकते असेही आमदार अग्रवाल यांनी सुचविले.