रस्ते दुरूस्तीवर शासकीय निधीची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 01:25 AM2017-02-11T01:25:04+5:302017-02-11T01:25:04+5:30
राज्य शासनाने ग्रामीण रस्ते राज्यमार्गाशी जोडून वाहतूक संपर्क सुलभ करण्यासाठी डांबरीकरण रस्ते बांधकामाला सुरूवात केली.
सहा महिन्यांतच रस्त्यांची वाताहत : सिमेंट काँक्रिट रस्त्यांची मागणी
आमगाव : राज्य शासनाने ग्रामीण रस्ते राज्यमार्गाशी जोडून वाहतूक संपर्क सुलभ करण्यासाठी डांबरीकरण रस्ते बांधकामाला सुरूवात केली. परंतु डांबरीकरण रस्ते बांधकामात दुरूस्तीचे कार्य गुणवत्ताहीन असल्यामुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे. नागरिकांनी डांबरीकरण रस्त्यांना थांबवून सिमेंट काँक्रीट रस्त्यांची मागणी केली आहे.
राज्यातील ग्रामीण रस्ते राज्य महामार्गाला जोडून, ग्रामीण भागातील वाहतूक सुलभ व्हावी व ग्रामीण उद्योग व्यवसायांना व रोजगार उपलब्धतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने रस्ते बांधणी योजना कार्यान्वित केली. रस्ते बांधकाम व दुरूस्ती गतीशील व्हावी यासाठी शासनाने रस्ते बांधकामासाठी स्वतंत्र विभागांची निर्मिती केली. योजनेला निधी मंजूर करून रस्ते बांधकाम दुरूस्तीला गती देण्यात आली. परंतु शासनाकडून रस्ते बांधकाम दुरूस्तीला मिळणारा निधी खर्च करूनही निर्माण होणारे रस्ते अधोगतीला पोहोचले.
ग्रामीण भागातील दळणवळण शहरांच्या दिशेने गतीशील व्हावी यासाठी शासनाने डांबरीकरण रस्ते व दुरूस्तीला योग्य दिशा दिली. परंतु निर्माण होणारे डांबरीकरण रस्ते अवघ्या सहा महिन्यांतच उखडले. त्यामुळे रस्त्यांवर पडणारे खड्डे, बाहेर पडणारे भगदाड वाहतुकीला आव्हाण देणारे ठरत आहेत.
शासनाकडून दरवेळी रस्ते विकास बांधकामावर कोट्यवधी रूपयांचा निधी उधळला जात आहे. रस्ते बांधकाम झाल्यानंतर अवघ्या अल्प कालावधीत रस्त्यांवर पडणारे खड्डे अपघातांना आमंत्रण देतात. ग्रामीण भागातून गेलेल्या राज्यमार्गावर डांबरीकर रस्त्यांच्या वाताहतीमुळे दरवर्षी मार्ग बाधीत होतात. तर वाहनांच्या अपघातामुळे अनेक नागरिकांचा बळी जात आहे. मात्र अपघातांची दखल केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरूस्तीपर्यंतच असते. त्यामुळे डांबरीकरण रस्ते बांधकाम दुरूस्तीवरील कामांवर कोट्यवधींचा निधी मुरत जातो.
शासनाने डांबरीकरण रस्ते बांधकाम दुरूस्तीवरील खर्चाची खातरजमा करून याबाबत निर्णय घ्यावे. तसेच डांबरीकर रस्त्यांची बांधणी बंद करून नागरिकांना दळणवळणासाठी सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या बांधणीला हिरवा कंदील द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.