आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासन न्याय देणार?
By admin | Published: January 19, 2017 01:27 AM2017-01-19T01:27:55+5:302017-01-19T01:27:55+5:30
आदिवासी सहकारी संस्थेतून ४० हजार रु. कर्ज घेतलेल्या कर्जाची परतफेड न करू शकल्याने त्रस्त शेतकऱ्याने ३ महिन्यापूर्वी विहीरीत
देवरी : आदिवासी सहकारी संस्थेतून ४० हजार रु. कर्ज घेतलेल्या कर्जाची परतफेड न करू शकल्याने त्रस्त शेतकऱ्याने ३ महिन्यापूर्वी विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली होती. परंतु शासनाकडून मृतक शेतकऱ्याच्या परिवाराला कोणतीच आर्थिक मदत न मिळाल्याने मृतक शेतकऱ्याच्या परिवार आर्थिक संकटात सापडला असून परिवाराला शासन न्याय कधी देणार? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांची आजारी पत्नी कलावती यांनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील फुटाणा या गावातील शेतकरी मुरारी श्रावण राऊत (६६) यांनी २५ आॅक्टोबर २०१६ रोजी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली होती. मुरारी राऊत यांनी आदिवासी सहकारी संस्थेतून शेतीकरीता ४० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. दुसरीकडे मागील २० वर्षापासून पत्नी कलावती ब्लडप्रेशर व डायबीटीजमुळे बिमार होती. तिला नेहमी गोंदियाला उपचाराकरीता न्यायला खुप पैशाचा खर्च होत होता.
शेतात पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने व घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी या चिंतेने ग्रस्त मुरारी श्रावण राऊत यांनी २३ आॅक्टोबरला घर सोडले. नातेवाईकांकडे शोध घेऊन ही पत्ता न लागल्याने घर कुटूंबातील सदस्यांनी पोलीस स्टेशन चिचगडला तक्रार केली होती. २५ आॅक्टोबरला मुरारीचे प्रेत गावातीलच नुतन बन्सोड यांच्या शेतातील विहीरीत सापडले.
मृतक शेतकऱ्याकडे सोसायटीचे कर्ज होते व कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा पुरावा प्रशासनीक अधिकारी यांचेकडे देण्यात आले.परंतु न्याय मिळत नसल्याने मृतकाच्या पत्नी कलावती यांनी आमदार व पालकमंत्र्याकडे निवेदन सादर करून शेतकरी आत्महत्या निधीतून शासनाकडून मदत व शेतीवर घेण्यात आलेले कर्ज माफ करण्याची विनंती केली आहे.
विशेष म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला शासन तातडीने मदत करीत असते. परंतु या मृतक परिवाराच्या सदस्यांना अजून किती वेळ वाट पाहावी लागणार असा सवाल मृतकाची पत्नी कलावती यांनी केला आहे.