सरकार आरक्षण देण्याचे गाजर देत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:47 AM2018-05-25T00:47:36+5:302018-05-25T00:47:36+5:30
केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारला मागील चार वर्षांत ठोस असे काहीच करता आले नाही. या सरकारने जनतेला केवळ पोकळ आश्वासने देवून दिशाभूल करण्याचेच काम केले. आता सरकार धनगर, मुस्लिम व लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचे गाजर देत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा: केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारला मागील चार वर्षांत ठोस असे काहीच करता आले नाही. या सरकारने जनतेला केवळ पोकळ आश्वासने देवून दिशाभूल करण्याचेच काम केले. आता सरकार धनगर, मुस्लिम व लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचे गाजर देत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा. पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ तिरोडा येथे गुरुवारी (दि.२४) प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी आ. दिलीप बंसोड, राजेंद्र जैन, रमेश पारधी, माजी मंत्री अनिल देशमुख, विनोद हरिणखेडे, राधेलाल पटले, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे, उमेंद्र भेलावे, गणेश बरडे, निता रहांगडाले, माजी नरेश माहेश्वरी, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, किशोर गजभिये उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, या सरकारने शत्रू राष्ट्र असलेल्या पाकीस्तानकडून साखर आयात केली. आपला शेतकरी इकडे ऊस पिकवितो व पाकिस्तानातून हे सरकार साखर आयात करुन त्यांचे हाथ बळकट करीत आहे. नोटबंदीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. अच्छे दिन आनेवाले है? ते कुठे गेले गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे का आले नाही. कर्नाटकात सर्व विरोधक एकत्र आलेत तर उत्तरप्रदेशात मायावती व अखिलेश यादव एकत्र आले. आता या शासनाचे काही खरे नाही. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शौचालयाचा वापर करा, बांधकाम करा, पण पाणीच नाही तर त्याचा उपयोग काय? असा टोला त्यांनी लगावला. गडकरी साहेबांनी मागील सभेत बारा हजार कोटी रुपयांचे रस्ते बांधणार असे सांगितले. हे खरच होणार आहे का? बोलाचीच कडी व बोलाचेच भात आहे. यात लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खर नाही, असेही सांगितले. तुरीला देशात भाव नाही व सरकार परदेशातून तूर आयात करीत आहे. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले.