शासकीय जीएनएम महाविद्यालय यावर्षीच
By admin | Published: July 6, 2016 02:10 AM2016-07-06T02:10:43+5:302016-07-06T02:10:43+5:30
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने येत्या १ आॅक्टोबर २०१६ पासून गोंदियात शासकीय जीएनएम नर्सिंग महाविद्यालय स्थानिक बीजीडब्ल्यू रूग्णालयात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आॅक्टोबरमध्ये होणार प्रवेश सुरू : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नर्सिंगचे वरिष्ठ शिक्षण
गोंदिया : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने येत्या १ आॅक्टोबर २०१६ पासून गोंदियात शासकीय जीएनएम नर्सिंग महाविद्यालय स्थानिक बीजीडब्ल्यू रूग्णालयात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर तीन वर्षीय पदवीचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमुख नर्सच्या पदावर नियुक्ती मिळण्याची संधी मिळेल.
या संदर्भात आ. गोपालदास अग्रवाल यांनी आरोग्य विभागाचे सहसचिव, संचालक तथा गोंदियाचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भीसे यांची बैठक मुंबई येथे घेतली होती. यात काही काळापूर्वी केंद्र शासनाची मंजुरी तथा संस्थेच्या स्थापनेसाठी केंद्र शासनाने सात कोटींचा निधी मिळल्यानंतरही गोंदियात शासकीय जीएनएम नर्सिंग कॉलेज सुरू न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव सुजाता सौनीक बैठकीत उपस्थित होवू शकल्या नव्हत्या. परंतु सहसचिव यांनी त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली व १ आॅक्टोबर २०१६ पासून शासकीय जीएनएम नर्सिंग कॉलेज स्थानिक बीजीडब्ल्यू रूग्णालयात सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या संदर्भात आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनीकसुद्धा ४ जुलै रोजी आ. गोपालदास अग्रवाल यांची भेट घेवून त्यांना याबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती सांगणार आहेत.
आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री गुलामनबी आझाद यांच्या निर्देशाने आरोग्य तथा परिवार कल्याण मंत्रालयाने गोंदियात शासकीय जीएमएम नर्सिंग कॉलेजला मंजुरी देवून उपसंचालक आरोग्य सेवा (नर्सिंग) महाराष्ट्र शासनाला ७ कोटींचा निधी जीएनएम नर्सिंग कॉलेजच्या स्थापनेसाठी जाहीर केला होता.
तसेच कुडवा येथील जलशुद्धीकरण केंद्रासमोर वन विभागाची पाच हेक्टर जमीन शासकीय जीएमएम तथा एएनएम नर्सिंग महाविद्यालासाठी वन कायद्यांतून मुक्त केली होती. केंद्र शासनाने जीएनएम नर्सिंग कॉलेजला मंजुरी आपल्या आदेशाने (झेड २८०१५/०१/२०१२-एन, दि.१२ डिसेंबर २०१३) अंतर्गत जारी केले होते.
राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी गोंदियात एएनएम नर्सिंग महाविद्यालयासाठी (एक वर्षीय डिप्लोमा कोर्स) मंजुरी दिली होती. सध्या बीजीडब्ल्यू शासकीय रूग्णालयात राज्य शासनाने एएनएम नर्सिंग डिप्लोमा कोर्स सुरू केलेला आहे. यात सर्व २० जागांवर गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
या संस्थेतून अनेक विद्यार्थ्यांनी एएनएम डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेला आहे. (प्रतिनिधी)
गोंदियात शिक्षणाच्या सर्व सुविधा
जीएमएम नर्सिंग अभ्यासक्रमात बारावीनंतर प्रवेश घेतला जातो. हे तीन वर्षीय पदवी कोर्स आहे. तसेच एएनएम नर्सिंग कोर्समध्ये दहाव्या वर्गानंतर प्रवेश घेतला जावू शकतो व हा एक वर्षीय डिप्लोमा कोर्स आहे. दोन्ही कोर्सेससाठी सुरू होणाऱ्या शासकीय महाविद्यालयात दरवर्षी ४०-४० विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. जिल्ह्यात शासकीय एएनएम, जीएनएम महाविद्यालयांसह शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाची स्थापनासुद्धा झालीच आहे. यात दरवर्षी २४० विद्यार्थ्यांना विविध कोर्सेससाठी प्रवेश दिला जातो. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नुकतेच दोन नवीन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजची प्रवेश क्षमता ३६० झाली आहे. विशेष म्हणजे या ३६० विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के म्हणजे एकूण २५२ विद्यार्थी गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या असल्याची माहिती आ.गोपालदास अग्रवाल यांनी कळविली.