प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला
By admin | Published: September 13, 2014 11:59 PM2014-09-13T23:59:25+5:302014-09-13T23:59:25+5:30
निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारी लागू केल्यानंतर जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा जोमात कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
विधानसभा निवडणूक : अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित
गोंदिया : निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारी लागू केल्यानंतर जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा जोमात कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अमित सैनी यांनी शनिवारी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यशाळेला जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त जिल्हाधिकारी चोरमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के. लोणकर प्रामुख्याने उपस्थित होते.
गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि आमगाव या चारही विधानसभा मतदार संघांमध्ये २००९ च्या निवडणुकीच्या वेळी एकूण ८ लाख ७० हजार २७२ मतदार होते. यावेळी त्यात १ लाख ४८ हजार २९६ मतदारांची भर पडल्याने मतदारांची एकूण संख्या १० लाख १८ हजार ५६८ झाली आहे. चारही विधानसभा मतदार संघांबाबतची सविस्तर माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात प्रत्येक मतदार संघात नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात तीन-तीन भरारी पथके तैनात राहणार आहेत. याशिवाय तीन-तीन स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आणि व्हिडीओ चित्रिकरण करणारी टीम राहणार आहे. राजकीय पक्षांच्या मिरवणुका, सभा, पेंडॉल येथे चित्रीकरण केले जाणार आहे.
विशेष म्हणजे ५० हजारापेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगणाऱ्या कोणत्याही नागरिकाची तपासणी होऊ शकते. त्यासाठी त्यांना संबंधित रकमेबद्दलची कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच १० लाखापेक्षा जास्त रकमेची तपासणी आयकर विभागाकडून होणार असल्याचे सांगण्यात आले. अर्जुनी मोरगाव मतदार संघात अर्जुनी, सडक अर्जुनी आणि गोरेगाव तालुक्याचा काही भाग येतो. तिरोडा मतदार संघात तिरोडा, गोरेगाव आणि गोंदिया मतदार संघाचा काही भाग समाविष्ठ होतो. आमगाव मतदार संघात आमगाव, देवरी आणि सालेकसा हे तीन तालुके तर गोंदिया मतदार संघात केवळ गोंदिया तालुक्याचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)