महाराष्ट्र शासनाच्या कामांचे फलक मराठीत करण्यात यावे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:29 AM2021-03-05T04:29:03+5:302021-03-05T04:29:03+5:30
गोंदिया : राज्याची मायबोली मराठी असताना विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या कामांच्या उद्घाटन व लोकार्पणाचे फलक हिंदी भाषेत लावले ...
गोंदिया : राज्याची मायबोली मराठी असताना विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या कामांच्या उद्घाटन व लोकार्पणाचे फलक हिंदी भाषेत लावले जात आहेत. मात्ऱ यापुढे असे फलक मराठी भाषेतच लावण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. अन्यथा असे कार्य करणाऱ्या संबंधित अधिकारी व फलकाला काळे फासले जाईल. तसेच मराठी भाषेचा द्वेष असल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मनसेने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र राज्यात राहणारे मराठी भाषिक अधिकारी असतानासुध्दा गोंदियातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व नगर परिषद कार्यालयामार्फत जिल्ह्यात होत असलेल्या कामांचे उद्घाटन व लोकार्पणाचे फलक हिंदी भाषेत असल्याचे निदर्शनास येत आहेत. आपले कार्यालय महाराष्ट्र राज्यात असून महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे. जनहितार्थ कामेसुध्दा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होतात. करिता यानंतर कोणत्याही प्रकारच्या कामांचे उद्घाटन किंवा लोकार्पणाचे फलक फक्त मराठी भाषेतच असायला पाहिजे. तसेच ज्या-ज्या ठिकाणी लागलेले हिंदी भाषेतील फलक मराठीत करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. अन्यथा हिंदी भाषेतील फलक दिसल्यास त्याला व संबंधित कनिष्ठ अभियंतांच्या तोंडाला सुध्दा काळे फासले जाईल. तसेच मराठी भाषेबद्दल द्वेष असल्यामुळे हिंदी भाषेचा वापर करीत असल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद कार्यालय व नगर परिषद कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे, शहराध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे व पदाधिकारी उपस्थित होते.