पाच जिल्ह्यांतील शासकीय धान भरडाईचा तिढा कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:26+5:302021-05-08T04:30:26+5:30
अंकुश गुंडावार गोंदिया : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत हमीभावाने धान खरेदी केली जाते. गेल्या खरीप हंगामात ...
अंकुश गुंडावार
गोंदिया : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत हमीभावाने धान खरेदी केली जाते. गेल्या खरीप हंगामात या पाचही जिल्ह्यांत १ कोटी क्विंटल धान खरेदी करण्यात आली; पण या धानाची उचल करून भरडाई करणे राइस मिलर्सने मागील तीन महिन्यांपासून थांबविले आहे. परिणामी, यापैकी ४५ लाख क्विंटल धान उघड्यावर तर उर्वरित धान गोदामांमध्ये पडला असून त्याची त्वरित उचल न झाल्यास तो खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची जिल्हा मार्केटिंग फेडरेशन राइस मिलर्ससह करार करून भरडाई करतात. त्यानंतर राइस मिलर्स भरडाई केलेला सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा करतात. मात्र, यंदा धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची गुणवत्ता योग्य नसल्याने भरडाईनंतर धानाची उतारी कमी येत असून तुकडा होण्याचे प्रमाण ४५ टक्के आहे. त्यामुळे राइस मिलर्सला प्रति क्विंटल मागे ३०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यांतील राइस मिलर्सने धानाची उचल करणे मागील तीन महिन्यांपासून थांबविले आहे. परिणामी, मागील तीन- चार महिन्यांपासून खरेदी केलेला धान तसाच गोदामांमध्ये पडला असल्याने समस्या निर्माण झाली आहे.
......
या कारणामुळे भरडाई ठप्प
राइस मिलर्सला प्रति क्विंटल धानापासून ६७ किलो तांदूळ शासनाकडे जमा करावा लागतो, तर २५ टक्क्यांपर्यंत तुकडा हा स्वीकारला जातो. मात्र, सध्या १ क्विंटल तांदूळ भरडाई केल्यानंतर त्यापासून ६३ किलो तांदूळ होत असून, तुकड्याचे प्रमाण ४५ टक्के आहे. शिवाय धानाची गुणवत्तासुद्धा याेग्य नसल्याने प्रति क्विंटलमागे राइस मिलर्सला ३०० रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे तांदळाच्या गुणवत्तेवर सुद्धा परिणाम होत असून, भरडाई केलेला तांदूळसुद्धा स्वीकारण्यास एफसीआय नकार देत आहे. त्यामुळेच धानाची भरडाई पूर्णपणे ठप्प आहे.
.........
धानाचे अपग्रेड करण्याची मागणी
धानाची गुणवत्ता चांगली नसल्याने तांदळाचा उतारा कमी येत आहे. त्यामुळे धानाचे अपग्रेड करून प्रति क्विंटल २०० रुपये राइस मिलर्सला देण्यात यावे, तांदळातील तुकड्याचे प्रमाण २५ टक्क्यांवरून ४० टक्के करण्यात यावे, अशी मागणी राइस मिलर्स असोसिएशनने शासनाकडे केली आहे.
.......
केवळ ४५ लाख क्विंटल धानाची होणार भरडाई
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने मागील खरीप हंगामात पूर्व विदर्भात १ कोटी क्विंटल धान खरेदी केला होता. यापैकी ४५ लाख क्विंटल अद्यापही उघड्यावर पडला आहे. तर उर्वरित धान गोदामामध्ये आहे. शुक्रवारी (दि.७) गोंदिया येथे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील आणि राइस मिलर्स यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत १०० प्रति क्विंटल धानाचे अपग्रेड, प्रति क्विंटल धान भरडाईचा ५० रुपये देण्याचे आश्वासन विलास पाटील यांनी दिले. त्यानंतर राइस मिलर्सनी उघड्यावर असलेल्या धानाची भरडाई करून देण्याची तयारी दर्शविली. मात्र, गोदामातील धानाची भरडाई करण्यासंदर्भात कुठलाच निर्णय झाला नसल्याचे राइस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी सांगितले.