राजकीय दबावात पाडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:19 PM2017-10-04T23:19:29+5:302017-10-04T23:19:41+5:30
तिरोडा नगर पालिकेच्या निवडणुकीत मतदान केले नसल्याचा ठपका ठेवून सूडबुद्धिने नगर पालिका प्रशासनाने राजकीय दबावात .....
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा नगर पालिकेच्या निवडणुकीत मतदान केले नसल्याचा ठपका ठेवून सूडबुद्धिने नगर पालिका प्रशासनाने राजकीय दबावात बुधवारी (दि.२९) नियमबाह्य कार्यवाही करुन एका गरीब दलित व्यक्तींचे बांधकाम जमीनदोस्त केल्याचा आरोप आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
प्रेमलता सूर्यभाव गजभिये यांचे शहरातील जुनी वस्ती येथे स्वत:चे वडिलोपार्जित राहते घर आहे. चार मुलांच्या त्यांच्या संसारात अल्पावधित मुलीला वैधव्य प्राप्त झाले. त्यामुळे मुलीच्या अपंग मुलासह सर्व जबाबदारी प्रेमलता यांच्यावर आली. अशातच लहान मुलाची खासगी ठिकाणातील नोकरी सुटली. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मुलीला मिळणारे निराधाराचे ६०० रुपये आणि प्रेमलता यांना मिळणाºया बिडीच्या हजार रुपयांच्या पेन्शनमधून घर कसे चालवावे, असा बिकट प्रश्न त्यांच्यासमोर होता.
मुलगी शिवणकला शिकली असल्याने तिला घरासमोर एक छोटेखानी रुम काढून शिवणकलेचे दुकान लावण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी इकडून-तिकडून पैशांची जुळवा-जुळव करण्यात आली. घरातील थोडेफार दागिने गहाण टाकण्यात आले. बांधकाम थोडे वर आले आणि त्यातच पालिका प्रशासनाने सूड उगविला. सगळे बांधकाम क्षणात जमीनदोस्त केले. नगर पालिकेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला मतदान न केल्याचा ठपका ठेवत शेजारच्याच काही लोकांनी बांधकाम अतिक्रमणात असल्याची तक्रार केली.
त्यावर पालिका प्रशासनाने प्रेमलता यांना दिनांक १६ सप्टेंबर रोजी बांधकामाची परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवत सुरु असलेले बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले. प्रेमलता यांनी बांधकाम थांबवून २० सप्टेंबर रोजी नगर पालिकेच्या नोटिसचे उत्तर दिले. बांधकामाची परवानगी घेतली नसल्याची चूक झाली असल्याचे पत्रात नमूद करुन बांधकामाची परवानगी देण्याची विनंतीसुध्दा त्यांनी पत्रातून केली. मात्र, पालिका प्रशासनाने या पत्राबाबत कोणतेही उत्तर दिले नाही. किंबहूना प्रेमलता यांची जागेची रजिस्ट्रीची कोणतीही तपासणी केली नाही. वास्तविकत: तक्रारकर्ते आणि प्रेमलता या दोघांना बोलावून त्यांच्या जागेच्या रजिस्ट्रीची पाहणी करणे गरजेचे होते. परंतु तशी कोणतीच प्रक्रिया नगर पालिका प्रशासनाने पार पाडली नाही.
उल्लेखनीय म्हणजे प्रेमलता यांनी पालिका प्रशासनाला नोटीस येण्यापूर्वीच एक पत्र देवू केले. मात्र त्यांचे पत्र स्वीकारण्यातच आले नसल्याचे प्रेमलता यांनी सांगितले. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जुनीवस्तीमधील सर्वच घरे आबादीच्या जागेत आहेत. वस्तीच्या मधातून बाजाराकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. रस्त्याला लागून असणाºया नालीच्या बांधकामानंतर वस्तीतील लोकांनी आपल्या घराचे बांधकाम केले. तसेच बांधकाम प्रेमलता यांनी सुध्दा सुरु केले होते. बांधकाम जर अतिक्रमणात होते तर अतिक्रमण कोणत्या आधारावर ठरविण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याला केंद्रबिंदू ठरवून त्याचे मोजमाप का करण्यात आले नाही. याच रस्त्यावर अनेकांनी आपले बांधकाम आणले, त्याबाबत पालीका प्रशासनाची भूमिका काय. संपूर्ण बांधकाम अतिक्रमणात होते का, जर नव्हते तर अतिक्रमणात असलेलेच बांधकाम का पाडण्यात आले नाही, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने वस्तीतील लोकांत चर्चेत आहेत. दरम्यान पालिका प्रशासनाने केवळ बांधकामाची परवानगी नसल्याचा ठपका ठेवून राजकीय सूडभावनेतून केल्याचा आरोप आहे. या बांधकामाला लागलेला पैसा पालिका प्रशासनाने भरुन द्यावा, अशी मागणी प्रेमलता गजभिये यांच्यासह वस्तीतील लोकांनी केली असून प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा गजभिये यांनी दिला आहे.
शहरातील अतिक्रमणाचे काय?
तिरोडा शहरातील बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. शहरातील खैरलांजी रोडवर अनेकांनी अतिक्रमण केले. त्यामुळे नेहमीच याठिकाणात रहदारीचा प्रश्न निर्माण होतो. जुन्या रुग्णालयाच्या परिसरात, शहिद मिश्रा शाळेसमोर, रेल्वे स्टेशन रस्त्यावर अनेकांचे अतिक्रमण आहे. एवढेच नव्हे तर काही राजकीय व नगर पालिकेतील कर्मचाºयांचे घर सुध्दा अतिक्रमणात येते. त्यावर कोणतीच कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही.