व्यापाऱ्यांकडूृन शेतकऱ्यांची लूट होऊ नये, यासाठीच शासकीय खरेदी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:31 PM2018-11-02T23:31:52+5:302018-11-02T23:32:33+5:30
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुट होऊ नये, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळाला पाहिजे या उद्देशाने शेतकऱ्यांचे हित सर्वोतोपरी डोळ्यासमोर ठेऊन शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुट होऊ नये, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळाला पाहिजे या उद्देशाने शेतकऱ्यांचे हित सर्वोतोपरी डोळ्यासमोर ठेऊन शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहेत.
पीक नुकसान, तुडतुड्यासारख्या रोगाने होणारे शेतकऱ्यांचे नुकसानीची भरपाई पीक विमा योजनेत लागू करण्याचा विचार आहे. याबाबत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढाव घेऊन निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
नवेगावबांध येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार यार्डात सोमवारी आयोजित आधारभूत धान खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी बोलत ते होते. या वेळी उपजिल्हाधिकारी लटारे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष नामदेव कापगते, पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर, कृउबाचे सभापती कासिम जफा कुरैशी, सरपंच अनिरुध्द शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, सहकारी बँकेचे संचालक केवळराम पुस्तोडे, शिवनारायण पालीवाल, विजया कापगते, खंबायती मडावी, खुशाल काशिवार, अण्णा डोंगरवार, होमराज ठाकरे, गंथडे उपस्थित होते. खरीप हंगाम २०१८-१९ साठी शासकीय आधारभूत किंमत धानखरेदी योजनेअंतर्गत हे केंद्र सुरु करण्यात आले आहे.
बडोले म्हणाले, शासकीय धान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा हा या मागील हेतू आहे. हमीभावापेक्षा कमी दराने धान खरेदी करणाऱ्याची गय केली जाणार नाही. असा प्रकार घडल्यास शेतकऱ्यांनी थेट आपल्याकडे तक्रार करावी असे बडोले यांनी या वेळी मार्गदर्शनात सांगितले.