शेळीपालनाने सरस्वतीला मिळाले आर्थिक पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 08:40 PM2017-12-11T20:40:16+5:302017-12-11T20:43:53+5:30
सालेकसा तालुक्याच्या पानगाव येथून तीन किमी अंतरावर सोनपुरी गाव आहे. या गावात सरस्वती महेश कुराहे ह्या दारिद्र्यावस्थेत सहकुटुंब जीवन जगत असतानाच त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण गरिबीतून बाहेर पडू शकतो, अशी प्रेरणा मिळाली.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या पानगाव येथून तीन किमी अंतरावर सोनपुरी गाव आहे. या गावात सरस्वती महेश कुराहे ह्या दारिद्र्यावस्थेत सहकुटुंब जीवन जगत असतानाच त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण गरिबीतून बाहेर पडू शकतो, अशी प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांनी गावातील कीर्ती स्वयंसहाय्यता महिला बचत गटातून कर्ज घेऊन शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला व आज त्यांची गरिबीतून बाहेर पडण्याची धडपड सुरू आहे.
सुरूवातीला गावातील महिला गटात येण्यास घाबरत होत्या. गटात आल्यावर कर्ज घ्यायलासुद्धा घाबरत होत्या. मात्र नंतर ११ महिला कीर्ती बचत गटात आल्या. त्यापैकीच एक सरस्वती कुराहे. महिलांना ५० रूपये मासिक बचत करण्याची सवय लागली. अंतर्गत कर्ज घेणेही सुरू केले. परतफेडीचीही सवय लागली. त्यानंतर सरस्वती यांनी सीआयएफ १० हजार रूपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्यांनी दोन शेळ्या खरेदी केल्या. गावातच त्यांचा व्यवसाय चांगल्याप्रकारे सुरू झाला. तसेच ग्रामसंस्थेमध्ये दर महिन्याला ६६७ रूपये यानुसार कर्ज परतफेड करणे सुरू केले.
त्यातच त्यांना कर्ज परतफेडीची चांगली सवय लागली. त्यानंतर त्यांना पुन्हा कर्जाची गरज पडली. आयसीआयसीआयमधून त्यांनी १० हजार रूपयांचे कर्ज घेतले. त्या कर्जातून त्यांनी पुन्हा शेळ्या खरेदी केल्या. त्या कर्जाची परतफेडसुद्धा ५०० रूपये महिना याप्रमाणे करीत आहेत. अशाप्रकारे सरस्वती यांनी आपल्या जीवनाची सुरूवात करून गरिबीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता कर्ज घेण्याची भीतीसुद्धा त्यांच्या मनातून निघून गेली. आणखी कर्ज घेवून आपला व्यवसाय वाढवावे, असा चंग त्यांनी बांधला आहे.
गटातून कमी व्याजदराने कर्ज घ्या, व्यवसाय करा, गरिबीतून बाहेर पडा व आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे योग्यरीत्या लालनपालन करा, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला. त्यांच्या शेळीपालन व्यवसायातून अनेक महिलांनी प्रेरणा घेवून त्यासुद्धा शेळीपालनासाठी पुढे आल्या आहेत.
नियमित परतफेड
सोनपुरी गावात माविमचे १२ गट आहेत. एक एसटी गट आहे. सर्व गट महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित असून गटातील सर्वच महिला गरीब व गरजू आहेत. कीर्ती स्वयंसहायता महिला बचत गटात एकूण ११ सदस्य असून त्यापैकीच एक म्हणजे सरस्वती महेश कुराहे. मासिक बचत प्रत्येकी ५० रूपये आहे. ललिता राजकुमार कुराहे गटाच्या अध्यक्ष तर मंतुरा लिलाराम कुराहे सचिव आहेत. या गटातील महिला कर्ज घेऊन नियमित परतफेड करीत आहेत.