ग्रा.पं. निवडणुकीसाठी केवळ २१० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 09:45 PM2017-09-27T21:45:16+5:302017-09-27T21:45:28+5:30
जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारी (दि.२७) सहावा दिवस होता. सहा दिवसांच्या कालावधीत केवळ २१० उमेदवारांनी नामाकंन अर्ज दाखल केले.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी आता दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या कालावधीत उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ३४७ सरपंच व २९३९ सदस्य पदांसाठी आतापर्यंत १९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, आमगाव तालुक्यात अद्याप नामांकन अर्ज दाखल झालेले नाही. येत्या १६ आॅक्टोबर रोजी ३४७ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे. याकरिता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आॅनलाईन प्रक्रियेमुळे इच्छूक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास चांगलीच दमछाक करावी लागत आहे.
२९ सप्टेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नामांकन दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी देखील नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र नव्हते. जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह २९३९ ग्रा.पं.सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. आजपर्यंत अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३१ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. तर तिरोडा येथे ५८ नामांकन असे एकूण ६८ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. गोंदिया येथे सरपंचपदासाठी १० तर सदस्यपदांसाठी २८ असे एकूण ३८, सालेकसा तालुक्यात सरपंचपदासाठी ७ तर सदस्यपदासाठी ३० असे एकूण ३७, सडक-अर्जुनी तालुक्यात सरपंचपदासाठी ८, गोरेगाव तालुक्यात सरपंचपदासाठी २ तर सदस्यपदासाठी ११ असे एकूण १३ व देवरी तालुक्यात भागी आणि सिरपूर या दोन गावांच्या सदस्यपदासाठी फक्त २ अर्ज प्राप्त झाले आहेत. असे एकूण जिल्ह्यात २१० नामांकन अर्ज यंत्रणेकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे.
नामांकन अर्ज दाखल करण्याचा सहावा दिवस असूनही आमगाव तालुक्यातील निवडणूक यंत्रणेकडे अद्याप नामांकनाचे खाते उघडलेले नाही. नामांकन दाखल करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.